एअर इंडियाच्या विमान दुरुस्तीमुळे गोवा–लंडन गॅटविक थेट सेवा बंद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th March, 11:54 pm
एअर इंडियाच्या विमान दुरुस्तीमुळे गोवा–लंडन गॅटविक थेट सेवा बंद

पणजी : एअर इंडियाच्या विमानांची सध्या दुरुस्ती व सुधारणा सुरू असल्यामुळे मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळापर्यंतची थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ही माहिती मुख्यमंत्री तसेच नागरी उड्डाण मंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बोईंग ७७७ आणि इतर मोठ्या विमानांच्या ताफ्याची दुरुस्ती व अद्ययावत कामे सुरू असल्यामुळे एअर इंडियाकडे विमानांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे लंडन गॅटविक ते मोपा अशी थेट सेवा सध्या स्थगित करण्यात आली आहे.
विमान कंपन्या नवीन हवाई मार्ग सुरू करण्यापूर्वी संबंधित मार्गाचा सर्वेक्षण करतात. त्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाकडे स्लॉटसाठी अर्ज केला जातो आणि त्यांच्या व्यावसायिक गरजेनुसार स्लॉट देण्यात येतात.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानसेवेला चालना देण्यासाठी गोवा सरकारने प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक नवीन हवाई मार्ग किंवा विमानतळावर सेवा सुरू करणाऱ्या विमान कंपनीला २ लाख रुपयांपर्यंत सवलत देण्यात येते. या योजनेत नियमित विमानसेवांसोबत आंतरराष्ट्रीय चार्टर विमानांचाही समावेश आहे. ही योजना दाबोळी आणि मोपा या दोन्ही विमानतळांसाठी लागू असून गोव्यातील पर्यटन आणि प्रवाशांची संख्या वाढवणे हा तिचा मुख्य उद्देश आहे.
मागील तीन वर्षांत दाबोळी विमानतळावरून सुमारे ६.३१ लाख प्रवाशांनी, तर मोपा विमानतळावरून ६.५४ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
प्रवाशांची संख्या
दाबोळी विमानतळ

२०२३ : ४,८१,९१३
२०२४ : ३,०२,१३०
२०२५ (जुलैपर्यंत) : १,१९,०३८
मोपा विमानतळ
२०२३ : ४४,२५३
२०२४ : २,२०,४३५
२०२५ (डिसेंबरपर्यंत) : ३,८९,८९५