हॉटेल-रेस्टॉरन्टवाल्यांना आता इलेक्ट्रीक इंडक्शन, चूलीचाच आधार

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; अन्न पदार्थांच्या दरात केली वाढ

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
21 mins ago
हॉटेल-रेस्टॉरन्टवाल्यांना आता इलेक्ट्रीक इंडक्शन, चूलीचाच आधार

 म्हापसा : गोव्याला (Goa) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinder) तुटवड्याची झळ हॉटेल-रेस्टॉरन्टवाल्यांना बसली आहे. व्यावसायिक तसेच घरगुती एलपीजी (LPG) मिळवण्यासाठी लोकांची धावपळ गेले चार दिवस सुरू आहे. या आपत्तीवर उपाय म्हणून काहीनी वीज इंडक्शन तसेच चूलीचा आधार घेतला आहे.  

 व्यावसायिक गॅस सिलिंडर नसल्यामुळे काही लहान हॉटेल्स (Hotels) व रेस्टॉरन्ट बंद झाली असून; उर्वरीत आस्थापनांनी आपला व्यवसाय मर्यादीत गॅस वापराद्वारे चालवला आहे. अशावेळी हॉटेलवाल्यांनी चहापासून जेवणाच्या थाळीची किंमत वाढवली आहे.

चहाकॉफी हॉटेल व्यवसायिकांनी चहा, मिरची, सामोसा, वडा तसेच भाजीपावचा दर ५ ते १० रूपयांनी वाढवला आहे. तर शाकाहारी,  मासळीच्या जेवणाच्या थाळीची किंमत देखील २० ते ५० रूपयांपर्यंत वाढवली आहे.

याशिवाय हॉटेल-रेस्टॉरन्ट व्यावसायिकांनी आपल्या पदार्थांमध्येही कपात केली आहे. गॅस जास्त लागणारा पदार्थ हा मेनू मधून गाळला गेला आहे. जे नियमित व जास्त मागणीचे पदार्थ असतात तेच बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या चवीचे पदार्थ मिळेनासे झाले आहेत.

 गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होण्ययाची चिन्हे दिसत नसल्यामुळे बार्देश तालुक्यातील मोठमोठी हॉटेल्स, रेस्टॉरंटसह लहान खानावळींनी देखील इलेक्ट्रीक इंडक्शन खरेदीला सुरूवात केली आहे. शिवाय काही व्यावसायिकांनी हॉटेल्ससाठी घराच्या आवारात दगडांच्या सहाय्याने चूल लावली असून; आस्थापनासाठी लागणारी भाजी आणि इतर अन्नपदार्थ या चूलीवर बनवायला सुरू केले आहेत.

हॉटेलवाल्यांचा कल इलेक्ट्रीक इंडक्शन चूल खरेदीकडे

हॉटेलवाल्यांनी इलेक्ट्रीक इंडक्शन चूल खरेदीकडे मोर्चा वळवल्याने;  या इंडक्शनची किंमत वाढण्याची     शक्यता असून, सरकारने इंडक्शनच्या दरावर नियंत्रण ठेवावे, जेणेकरून या संकटात आर्थिंक भुर्दंड सोसणे परवडणारे नाही, असे व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

 शॅक्स मालक संघटनेचे सरचिटणीस जॉन लोबो यांनी सांगितले की, गॅसचा तुटवडा असला तरीही आम्हाला आमचा व्यवसाय बंद करून ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही हजारो रूपये खर्चून इलेक्ट्रीक इंडक्शनची खरेदी केली आहे. इंडक्शनच्या आधारे मी तसेच आमचे सहयोगी व्यावसायिक आपला रेस्टॉरंटचा व्यवसाय चालवत आहेत.

 हॉटेल मालक मोहन सावंत म्हणाले की, गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे आमची समस्या वाढली आहे. यावर तोडगा म्हणून चूल थाटावी लागली आहे. या चुलीसाठी लागणारे दगड मिळवण्यातही अडचण आली.




हेही वाचा