गोवा बोर्डच्या संमतीने कोलवाळ येथील श्रीराम विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यासाठी खास सोय

म्हापसा : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा धडा देणारी प्रक्रिया आहे, याचे सुंदर उदाहरण कोलवाळ येथील श्रीराम विद्यामंदिराने घालून दिले आहे. अपघातात जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शाळेने बोर्डाच्या सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान त्याच्यासाठी खास व्यवस्था करून एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
अपघातामुळे हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या आणि बाकावर बसणे कठीण असलेल्या परीक्षार्थी मुलासाठी शाळेने चक्क बेडवर (पलंगावर) बसून पेपर लिहिण्याची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे बाकावर बसून तीन तास पेपर लिहिणे अशक्य होते. विद्यार्थ्याची ही अडचण लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घेतला आणि परीक्षा केंद्रावरच त्याच्यासाठी आरामदायी बेडची व्यवस्था केली.
या सुविधेमुळे शारीरिक वेदना होत असूनही या विद्यार्थ्याने आपला पेपर आत्मविश्वासाने पूर्ण केला. शाळेच्या या संवेदनशील निर्णयामुळे पालक आणि शिक्षण क्षेत्रातून श्रीराम विद्यामंदिर व्यवस्थापनाचे विशेष कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होऊ नये हाच आमचा उद्देश आहे, अशी भावना बोर्डचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी व्यक्त केली.