
मडगाव : दवंडे, फातोर्डा (Fatorda) येथे मेगा गृहप्रकल्प (Mega Housing Project) आल्यास आवश्यक असलेली कोणतीही संसाधने याठिकाणी नाहीत. यापूर्वीही या प्रकल्पाला विरोध केला होता व आताही विरोध आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे, आग्नेलो फर्नांडिस यांनी सांगितले. या प्रकल्पाला लोकांचा विरोध असून, सर्वांची मते जाणून घेत याबाबत भूमिका ठरवण्यात येईल, असे सांगण्यात आले.
दवंडे, फातोर्डा येथे मेगा गृहप्रकल्पाचे काम सुरु झालेले असून, बुधवारी स्थानिक लोकांनी एकत्र येत या प्रकल्पाला विरोध केला. १८ वर्षांपूर्वी हा गृहप्रकल्प येत असताना त्याला लोकांनी विरोध केला होता. त्यावेळी केवळ ७८ ते ८० फ्लॅटचा प्रकल्प होता. आता भूरुपांतर करुन याठिकाणी सुमारे ३०० फ्लॅटसच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा प्रकल्प स्थानिकांना नको असल्याने; बंद करण्यात यावा, अशी मागणी लुक फर्नांडिस यांनी केली.
एसजीपीडीए व मडगाव पालिका यांच्याकडे प्रकल्पाबाबत माहितीच्या अधिकारात अर्ज केलेला होता. पण त्यांनी परवाना क्रमांक आवश्यक असल्याचे सांगत अर्ज फेटाळले. प्रकल्पाच्या ठिकाणीही परवानगीबाबत कोणतीही माहिती नाही. प्रकल्पाबाबत पालिका मुख्याधिकार्यांची भेट घेतली होती. त्यांनी पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते व त्यांनी अभियंत्यांना पाठवलेले नाही. त्यामुळे आता पुन्हा पालिकेला जाब विचारण्यात येईल, असेही सांगितले.
मितिल्दा रिबेलो यांनी सांगितले की, स्थानिकांना हवा असलेला प्रकल्प होण्याची गरज आहे. प्रकल्पाला परवानगी देताना स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. या प्रकल्पामुळे स्थानिकांना अडचणी येणार असून हा प्रकल्प याठिकाणी नको, असे सांगितले.
या गृहप्रकल्पात फ्लॅटच्या किमतीच ३ ते ४ कोटी एवढ्या असून याठिकाणी फ्लॅट घेणारे हे गोमंतकीय नसतील. याठिकाणी केवळ मालमत्ता घेऊन ठेवून त्याठिकाणी कोणत्या गोष्टी चालतील हे सांगता येत नाही. या भागात कचर्याचा, पाण्याचा, सांडपाण्याचा प्रश्न आहे. यात आणखी वाढ होणार आहे. याशिवाय स्थानिकांच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत लोकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला.