अर्थसंकल्पीय अधिवेशन सहावा दिवस : गोवा शेतजमीन संरक्षण विधेयकावरून विधानसभेत गदारोळ!

विरोधक निषेध फलक घेऊन पोहोचले सभापतींच्या हौद्यात. कामकाज तीन वेळा तहकूब

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
48 mins ago
अर्थसंकल्पीय अधिवेशन सहावा दिवस : गोवा शेतजमीन संरक्षण विधेयकावरून विधानसभेत गदारोळ!

पणजी: गोवा विधानसभा अधिवेशनाचा सहावा दिवस आज विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे वादळी ठरला. शेतजमीन संरक्षण विधेयक खाजगी कामकाजात समाविष्ट न केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले. या गदारोळामुळे सभापतींना सकाळी तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले, परिणामी प्रश्नोत्तराचा आणि शून्य तासाचा वेळ कोणत्याही ठोस निष्कर्षाशिवाय वाया गेला.


सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्यासह सर्व विरोधी आमदार काळे कपडे परिधान करून आणि हातात निषेधाचे फलक घेऊन सभागृहात दाखल झाले. आजचा दिवस खाजगी कामकाजासाठी राखीव असतानाही शेतजमीन संरक्षण विधेयकाचा समावेश का केला नाही, असा जाब विरोधकांनी विचारला. टीसीपी कायद्यातील वादग्रस्त कलम ३९ (अ) आणि १७ (२) रद्द करण्याची मागणी या विधेयकाद्वारे करण्यात येणार होती. यावर सरकारने त्वरित स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत विरोधकांनी सभापतींच्या समोरील हौद्यात धाव घेतली. सभापतींनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळ न थांबल्याने त्यांनी मार्शलना पाचारण करून आमदारांना बाहेर काढण्याचे आदेश दिले आणि कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापतींनी स्पष्ट केले की, सदर विधेयक संबंधित खात्याकडे छाननीसाठी पाठवले असून त्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून अशाच प्रकारे विधेयके प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी 'करो या मरो'च्या घोषणा दिल्या. यावेळी सभापतींनी नक्कीच काम करा, पण मरण्याच्या गोष्टी करू नका, असा टोलाही लगावला. दरम्यान, गदारोळ सुरू असतानाच सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुडचडेचे आमदार निलेश काब्राल शून्य तासाचा प्रस्ताव मांडत असताना विरोधकांनी त्यांच्या जागेवर जाऊन अडथळा निर्माण केला. या  गोंधळामुळे सभापतींनी अखेर तिसऱ्यांदा कामकाज स्थगित केले. यामुळे सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या कामकाजाचा पूर्णपणे खोळंबा झाला.