श्री देव साळेश्वर पेठेचावाडा, कोरगाव

श्री देव साळेश्वर हे कोरगाव येथील देव श्री कमळेश्वर पंचायतनात येणाऱ्या श्री नारायण, श्री भूमिका, श्री द्वारपाल, श्री महालक्ष्मी, श्रीराम, श्री प्रयाग माधव, श्री रवळनाथ, श्री कवळ, श्री वंशेश्वर आदी पाच-पन्नास देवळे अाहेत. या सर्वांच्या बरोबरीने इथे वसलेले एक प्रमुख दैवत.

Story: देवभूमी गोवा |
12th March, 06:33 pm
श्री देव साळेश्वर  पेठेचावाडा, कोरगाव

पेडणे तालुक्यामध्ये वसलेले कोरगाव पेडण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. अनेक देवता, संत महात्मे, प्रवचनकार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी लोकपरंपरा, लोककला, लोकसंगीत, लोकसंस्कृती जपत तेजोमय होऊन तळपत आहे. गावाचा लौकिक संभाळणारे श्री कमळेश्वर पंचायतन आपल्या शक्तीने इतर देवतांसोबत गावाचे रक्षण करण्यास सज्ज अाहे. याच पंचायतनामध्ये श्री देव साळेश्वर आहे. कोरगावातील पेठेचावाडा या बाजारपेठेत तांदळाच्या गोणीमधून ही देवता इथे प्रगट झाली, अशी वदंता अाहे.

मंदिर आणि मूर्ती

पेठेचावाडा, कोरगाव येथे नयनरम्य निसर्गाच्या परिसरात डोंगराच्या पायथ्याशी श्री साळेश्वराचे मंदिर डौलाने उभे आहे. स्थापत्यशास्त्राला अनुसरून पूर्वीच्या काळी प्रमाणबद्धपणे बांधलेले देवालय वैशिष्ट्यपूर्ण अाहे. श्री साळेश्वराची मूर्ती आठव्या शतकातील आहे. काही प्रसिद्ध मूर्तिकारांच्या मते ही मूर्ती अतिशय दुर्मिळ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बदलत्या काळानुसार पाषाणी दगडाच्या मूर्तीत वाढ होत जाते. देवालयात डोळे मिटून मन स्थिर करून एकाग्रपणे देवाची प्रार्थना करून अापण पाहतो, तेव्हा अापल्यासमोर साकार रूपात नंदादीपाच्या स्निग्ध प्रकाशात झळाळणारी श्री साळेश्वराची विराट प्रतिमा दृष्टीस पडते. चतुरस्त्र अशा या मूर्तीच्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात अमृतकुंभ, तिसऱ्या हातात त्रिशूल, तर चौथ्या हातात डमरू अाहे. मूर्तीच्या दोन बाजूंना छोटे द्वारपाल अाहेत. मंदिराची रचना राजेशाही थाटाची आहे. पूर्वी अनेक न्यायनिवाडे या मंदिरात झाले. गावचा दसरोत्सव या मंदिरातून सुरू होतो आणि सांगताही याच ठिकाणी होते. इथले एकंदर उत्सव व परंपरांवर नजर टाकल्यास श्रीदेव साळेश्वराचे स्थान अग्रस्थानी आहे. कावी कलेचे नक्षीकाम नव्याने मंदिरामध्ये करण्यात आले आहे.

हाकेला ‘ओ’ देणारा श्री साळेश्वर

समस्त शेट्यांचे कुलदैवत, गावकऱ्यांना, भक्तांना साथ देणारा, संकट दूर करणारा, अशी श्री देव साळेश्वरची ख्याती आहे. समस्त शेट्ये कुटुंबीय कुळाचा उद्धार करणाऱ्या दैवतास मोठ्या भक्तीभावाने भजतात, त्याची उपासना करतात. भक्तांच्या हाकेला ‘ओ’ देणारा साळोबा भक्तांच्या कठीण प्रसंगी धावून येतो व संकटनिवारण करतो, अशी अनेकांनी प्रचिती घेतली आहे. पोर्तुगीजांच्या धर्मछळाचा वरवंटा फिरत असतानाही ही मूर्ती सुरक्षित राहिली.

मंदिरातील इतर पारिवारिक दैवते

श्री साळेश्वराचे देवालय म्हणजे राजवाडाच आहे. तिथे श्री देव साळेश्वर राजा अाहे. इतर पारिवारिक दैवते म्हणजे छोटेसे प्रधान मंडळ. गर्भगृहात ‘श्रीं’च्या उजव्या बाजूला काशीखंड ब्राह्मणाची प्रतिमा आहे. गर्भगृहाच्या बाहेर उजव्या बाजूला दस, वंस, अश्वारूढ पोसुरो, अश्वारूढ पूर्वंस, रवळशेट, भानशेट, तर डाव्या बाजूला बोडको व निर्वंस आहे. देवाच्या समोर ‘श्रीं’चे वाहन अश्व व पादुका आहेत. मंदिराबाहेर मंडपात न्याय देणारा नितकारी आहे. देवालयाच्या परिसरात शेट्ये कुटुंबाचा स्वाभिमानी सत्पुरुष श्री देव रघुगोनशेट आहे. इथून जवळ यक्षिणीचे पेड आहे. ते गर्द झाडांनी वेढलेले आहे. पलीकडे गुरांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध श्री देव कवळ्याचे मंदिर आहे. या सर्व परिवार देवतांची खास वैशिष्ट्ये अन त्यांची खास कामे पण आहेत. श्री देव साळेश्वर देवालय व श्रीदेव रघुगोनशेट व इतर परिवार देवतांचा जीर्णाेद्धार होऊन पुन:प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. सदर देवकृत्यास शेट्ये कुटुंबीयांनी, तसेच इतर ग्रामस्थांनी व भाविक-भक्तांनी आपली यथाशक्ती मदत केलेली आहे.

मंदिरातील उत्सव

श्री कमळेश्वर संस्थानात समाविष्ट अशा या मंदिरात प्रामुख्याने दसरोत्सव, जत्रोत्सव, श्री रघुगोनशेट महापूजा, श्री देव साळेश्वर वर्धापनदिन, श्री देवी यक्षिणी व श्री देव रघुगोनशेट वर्धापनदिन, शिमगा इत्यादी अनेक लहान-मोठे उत्सव होतात.

( कृष्णा रामचंद्र शेटये / राजमोहन शेटये / अॅड. श्याम अनंत शेट्ये