श्री निराकार देवालय, माशे-लोलये

माशे-लोलये येथे श्री नृसिंहरूपी विष्णूची उपासना श्री निराकार देवालयात स्तंभरूपात केली जात आहे. श्री निराकार हा लक्ष्मी नृसिंह निराकार म्हणूनही ओळखला जातो. गौड सारस्वत ब्राह्मणांनी पुढाकार घेऊन श्री निराकार स्तंभाची पूजा-अर्चा सुरू केली.

Story: देवभूमी गोवा |
12th March, 06:31 pm
श्री निराकार देवालय,  माशे-लोलये

गोमंतकातील काणकोण तालुक्यातील लोलये हे निसर्गरम्य गाव. शेकडो वर्षांपूर्वी लोलयेतून वाहणाऱ्या नदीतून व्यापारी गलबते मालवाहतूक करत. कालांतराने नदीच्या मुखाशी गाळ साठल्यामुळे बेट तयार झाले. याच बेटावर श्री निराकार मंदिर आहे. नदीच्या पात्रातील गाळ वाढत गेल्यावर गलबत वाहतूक भरती-ओहोटीनुसार करावी लागत असे. त्यामुळे शिवोली, कायसुव परिसरातील गलबतांवर काम करणारे नावाडी गलबत नांगरून नदीच्या काठावर रात्री मुक्काम करत. एके रात्री वस्तीसाठी थांबलेल्या नाविकांना नदीच्या पात्रात मधोमध असलेल्या बेटावर ज्योत पेटताना दिसली. त्यांना आश्चर्ययुक्त भीती वाटली. तरीही ‘दीप ज्योति नमोस्तुते’ या भावनेने त्यांनी त्या ज्योतीला मनोभावे नमस्कार करून प्रार्थना केली. पहाटे उजाडल्यावर पाहिले तर तेथे काहीच दिसत नव्हते ! फक्त एक लाकडाचा ओंडका आढळून आला. अद्भुत चमत्काराची खूण म्हणून नाविकांनी तो ओंडका बेटावर उभा करून ठेवला आणि त्या जागेला नमस्कार करून पुढील प्रवासाला गेले. आश्चर्य म्हणजे त्यांचा हा प्रवास अत्यंत सुंदर व लाभदायक झाला. परत आल्यावर हे नावाडी त्याच जागेवर जाऊन, ‘ती ज्योतच आपल्याला पावली’, असा भाव मनात ठेवून त्यांनी त्या ओंडक्याला फुले वाहून त्या ईश्वररूपी ज्योतीची प्रार्थना केली. त्यांना या प्रार्थनेमुळे लाभ होत आहे, असा अनेकदा अनुभव आला. प्रत्येक वेळेस येता-जाता हे नावाडी त्या लाकडी ओंडक्यास नियमितपणे फुले वाहू लागले. त्या भागात वसाहत करून राहिलेल्या गावकऱ्यांनी तो ओंडका बेटावर उभा असलेला पाहिला. नाविकांनी त्याला वाहिलेली फुलेही पाहिली. सहजभावे गावकरी त्या स्तंभाला किनार्‍यावरूनच हात जोडून नमस्कार करत. नाविकांप्रमाणेच गांवकऱ्यांनाही, ‘स्तंभाला श्रद्धापूर्वक नमस्कार केल्यास आपली दैनंदिन कामे लाभदायक होतात’, असा अनुभव आला.

‘निराकार’ नाव कसे पडले ?

स्तंभ पाण्यातून वर आल्यामुळे आणि सभोवार पाणीच पाणी असल्याने कदाचित लोक त्याला ‘श्री निराकार’ म्हणू लागले. कन्नड, संस्कृत व मराठीत पाण्याला ‘नीर’ म्हणतात, त्यामुळेही असेल. स्तंभरूपी, विशिष्ट स्वरूप नसलेला देव, म्हणूनही निराकार हे नाव प्रचलनात आल्याची शक्यता आहे. बेटावर स्तंभाजवळ जायला बर्‍याच जणांना शक्य नव्हते. अनेक जण त्यामुळे किनार्‍यावरूनच देवाची प्रार्थना करत. ओहोटीच्या वेळी स्तंभाजवळ जाण्याची वाट भाविकांनी शोधून काढली. त्या जागी फुले वाहून दिवा लावण्याची व्यवस्था करण्यात आली. निर्गुण परमेश्वराला अंतःकरणपूर्वक केलेली प्रार्थना ऐकू जाते. त्या काळात माशे-लोलये गावात गौड सारस्वत ब्राह्मण रहात असत. गौड सारस्वत समाजामध्ये प्रभूगावकर, भटगावकर, प्रभूमाळभाट, भिडे, बेलिये, प्रभूवारिक, प्रभूशास्त्री या कुटुंबांचे कुलदैवत आर्यादुर्गा निराकार आहे. त्यांनी पुढाकार घेऊन श्री निराकार स्तंभाची पूजा-अर्चा सुरू केली.

नूतन स्तंभाची स्थापना

पुढे काही काळानंतर मूळ स्तंभ जीर्ण झाल्यावर तो बदलून नवीन स्तंभ स्थापन करण्याची गरज निर्माण झाली. गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे गुरु श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाधीश प.पू. स्वामीजींच्या मार्गदर्शनाने जीर्ण स्तंभ जसा फणसाच्या लाकडापासून बनवलेला होता, तसाच नवीन स्तंभसुद्धा फणसाच्या लाकडापासून बनवून घेण्यात आला. त्यावर विशिष्ट आकृत्या व दृष्टी असे कोरीव काम केले. बेटावर स्तंभाच्या मूळ स्थानी एक चौथरा व एक छोटेसे मंदिर उभारून श्री निराकार देवाच्या नूतन स्तंभाची स्थापना करण्यात आली.

श्री निराकार देव झाला ‘बांधावेलो देव’

कालांतराने मूळ बेटाचा आकार वाढत गेला. बेटाभोवती दगडी भिंत बांधून पूर्ण करून घेण्यात आली. भरती-ओहोटीमुळे लोलये नदीचा प्रवाह दुभंगून बेटाच्या दोन्ही बाजूस वाहायला लागला. गावकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नांद्वारे बेटाच्या दोन्ही बाजूस वाहणार्‍या नदीच्या पात्रात बांध घालून घेतला. त्यामुळेच भक्तानां बांधावरून श्री निराकार देवालयात येण्याची सोय झाली. श्री निराकार देवाला ‘बांधावेलो देव’ असे नामाभिधान प्राप्त झाले. स्थानिक लोकगीतातून श्री निराकार देवाचा उल्लेख सापडतो. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाचे अठरावे मठाधीश, वृंदावनस्थ प.पू. पूर्णप्रज्ञ तीर्थ स्वामी यांनी इ.स. १८३८ मध्ये लोलये नदीवर स्वखर्चाने चिऱ्यांचा दगडी पूल बांधून दिल्याचा उल्लेख सापडतो.

काळ्या पाषाणापासून निर्मित स्तंभाची स्थापना

रम्य बेटावरील हे देवालय पूर्वाभिमुख आहे. देवालयाचा अष्टकोनी, ताम्रपटयुक्त घूड, अष्टदिक्पाल आणि सुवर्णलेपित शिखर कलश अत्यंत वेधक आहे. मंदिराची अंतर्गत रचना सुंदर आहे. इ.स. १९७७ मध्ये गर्भगृहात मूळ लाकडी स्तंभाऐवजी आता काळ्या पाषाणापासून निर्मित स्तंभ विधीवत स्थापित करण्यात आला आहे. मूळ लाकडी स्तंभावरील कोरीव काम नूतन पाषाण स्तंभावर जसेच्या तसे करण्यात आले आहे. मुख्य चौकात पाकळी प्रसाद (कौल) घेण्यासाठी स्तंभ आहे. सभामंडपात श्री निराकारासमोर मुख्यप्राण मारुती मंदिर आहे.

देवालयात साजरे करण्यात येणारे उत्सव

चैत्र पौर्णिमेस वार्षिक जत्रा, अक्षय तृतिया, श्रावण मासात जाईच्या कळ्यांची पूजा, श्री अनंत व्रत, वैकुंठ चतुर्दशी, नवरात्रोत्सव व दसरा, कार्तिक पौर्णिमेस वनभोजन व रथोत्सव, होलिकोत्सव व समुद्रस्नान इत्यादी उत्सव साजरे होतात. दीपमाळ, दिवजा या नावाने प्रसिद्ध दीपसोहळा चैत्र पौर्णिमेस होतो. श्री संकर्षण देवालय हे श्री निराकार देवाचे ‘अनुलगीक’ देवालय काजळकेर-लोलये येथे आहे. या देवालयात दसरा, जायांची पूजा, सरस्वतीपूजा, चवथी जत्रा, गोपाळ काला इत्यादी उत्सव साजरे होतात. देवालयातील दसरा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असून गोव्यात प्रसिद्ध आहे. लोककल्याणासाठी प्राणार्पण करणार्‍या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे मंदिर लोकांनी बांधले, अशी लोककथा आहे. श्री संकर्षण देवालयातील- हिंदू समाजाच्या अनेक ज्ञातींच्या सहभागातून नवरात्र आणि विजयादशमी साजरा करण्याची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे.