रस्त्यांच्या मुद्द्यावरही निवडणुका जिंकता येतात : मंत्री कामत

राज्यातील सर्व रस्त्यांची सुधारणा हे कर्तव्य

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
44 mins ago
रस्त्यांच्या मुद्द्यावरही निवडणुका जिंकता येतात : मंत्री कामत

मडगाव : रस्ते (Road) ही लोकांसाठी मूलभूत पायाभूत सुविधा आहे. रस्त्यांच्या विकासकामांवरही (Development) निवडणुका (Election) जिंकता येऊ शकतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून केवळ मडगाव नव्हे तर राज्यातील सर्व रस्ते हॉटमिक्सिंग करणे हे कर्तव्य आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.

मडगावातील कोंब परिसरातील रस्त्यांच्या कामांना मंत्री कामत यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. यानंतर मंत्री कामत यांनी सांगितले की, कोंब परिसरातील सर्व लहान मोठे रस्ते हॉटमिक्सिंग करण्याच्या कामाला सुरूवात झालेली आहे. यासाठी ३ कोटी ७५ लाखांचा खर्च केला जात आहे.

यापूर्वी शिरवडे भागातील रस्ते हॉटमिक्सिंग (Hotmixing) करण्यात आलेले आहेत. यानंतर मालभाट परिसरातील रस्ते हॉटमिक्सिंग केले जातील. टप्प्याटप्प्याने ही कामे पूर्ण केली जातील. कामांच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत, ‘वर्क ऑर्डर’ही देण्यात आल्या आहेत. 

आके, मडगाव येथे प्रमोद महाजन यांनी १९९४ मध्ये निवडणुकीच्या प्रचारा वेळी केलेल्या भाषणात रस्त्यांच्या विकासकामांचा मुद्दा अधोरेखित केला होता. त्यांच्या भाषणाच्या जोरावर त्यावेळी निवडणूक जिंकली होती.

त्यांची विचारधारा समोर ठेवून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे चांगल्या पायाभूत सुविधा देण्याचे कर्तव्य मानून राज्यातील रस्ते चांगले करण्यात येतील. ते कर्तव्य पार पाडण्यात कुठेही कमी पडणार नाही, असेही सांगितले.

वेस्टर्न बायपास मडगावला जोडणार, प्रस्ताव मंजूर

वेस्टर्न बायपासकडून थेट मडगावात येण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता. त्यामुळे वेस्टर्न बायपासवरुन विद्या विकास मंडळाच्या शैक्षणिक आस्थापना नजीक लिंकींग रस्ता करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेला होता. त्या २५ कोटींच्या रस्ता उभारणीला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. १५ दिवसांत या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया केली जाईल, अशी माहितीही मंत्री दिगंबर कामत यांनी दिली.


हेही वाचा