
पणजी : गोव्यात (Goa) मागील तीन वर्षांत सायबर गुन्हेगारांनी (Cyber criminals) ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करून तब्बल १०९ कोटी रुपये लुबाडले आहेत. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ३.०२ कोटी म्हणजेच दिवसाला सरासरी ९.९५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
एकूण रकमेपैकी पोलिसांना केवळ ९० लाख रुपये (०.८२ टक्के) रुपये परत मिळवण्यात यश आले आहे. वरील कालावधीत पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीच्या २९८ तक्रारी दाखल केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये राज्यात सायबर फसवणुकीच्या ८२ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्या वर्षी फसवणूक करून ६.२९ कोटी रुपये लुबाडले गेले. २०२४ मध्ये ८५ तक्रारी दाखल झाल्या. यात २७.२९ कोटी रुपये लुबाडण्याची तक्रार करण्यात आली. २०२५ मध्ये तक्रारींच्या संख्येसह फसवणूक झालेल्या रकमेत मोठी वाढ झाली. २०२५ मध्ये एकूण १३१ तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये ७५.४१ कोटी रुपये लुबाडण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.
वर्ष निहाय पाहता २०२३ मध्ये सायबर फसवणुकीद्वारे लुबाडलेले पैसे परत मिळवण्यात पोलिसांना (Goa Police) यश आलेले नाही. २०२४ मध्ये १३.१८ लाख रुपये परत मिळवण्यात आले. तर २०२५ मध्ये ७७.१३ लाख परत मिळवण्यात आले.
गोवा पोलिसांना सायबर गुन्हे रोखण्यासाठी त्यांचा तपास करण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे. सायबर पोलीस विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले जात आहे. तसेच शाळा, महाविद्यालये व अन्य ठिकाणी जागृती शिबिरे घेतली जात आहेत.
८६६ मोबाईल क्रमांक केले बंद
सायबर पोलिसांनी सायबर गुन्ह्यांशी निगडित असलेले ८६६ मोबाईल क्रमांक बंद केले आहेत. तसेच ४४२ वेब लिंक आणि १६८ सोशल मीडिया खाती देखील बंद करण्यात आली आहेत.