वडिलांच्या धूम्रपानामुळे मुलांमध्ये वाढू शकतो मधुमेहाचा धोका! : संशोधनातून निष्कर्ष

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
22 mins ago
वडिलांच्या धूम्रपानामुळे मुलांमध्ये वाढू शकतो मधुमेहाचा धोका! : संशोधनातून निष्कर्ष

नवी दिल्ली : वडिलांच्या (Father) धूम्रपानाच्या (Smoking) सवयीचा परिणाम त्यांच्या मुलांच्या आरोग्यावरही (Health) होऊ शकतो, असा धक्कादायक निष्कर्ष एका नव्या संशोधनातून (Research) समोर आला आहे. संशोधनानुसार, वडिलांकडून होणाऱ्या निकोटीनच्या प्रभावामुळे मुलांच्या शरीरातील साखर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना भविष्यात मधुमेह (Diabetes) होण्याचा धोका वाढू शकतो.

हे संशोधन ‘जर्नल ऑफ द एंडोक्राइन सोसायटी’मध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासात उंदरांवर प्रयोग करण्यात आला. संशोधकांना असे आढळून आले की, ज्या नर उंदरांना निकोटीन दिले गेले होते, त्यांच्या पिल्लांमध्ये चयापचयाशी संबंधित (मेटाबॉलिक) बदल दिसून आले.

सध्या मधुमेह हा जगभरातील एक गंभीर आरोग्यविषयक प्रश्न बनला आहे. अमेरिकेतच ४ कोटींहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त असल्याचे आरोग्य संस्थांचे आकडे सांगतात. मधुमेहामुळे हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार तसेच मज्जासंस्थेचे विकार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

संशोधनातील वरिष्ठ लेखिका डॉ. रॅक्वेल चामोरो-गार्सिया यांनी सांगितले की, “जेव्हा नर उंदरांना पिण्याच्या पाण्यातून निकोटीन देण्यात आले, तेव्हा त्यांच्या पिल्लांमध्ये शरीरातील साखरेच्या चयापचयाशी संबंधित बदल दिसून आले. यावरून पुरुषांच्या तंबाखू सेवनाचा त्यांच्या पुढील पिढीवर परिणाम होऊ शकतो आणि मुलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढू शकतो.”

प्रयोगातून काय आढळले?

संशोधकांनी निकोटीन दिलेल्या नर उंदरांच्या पिल्लांची तुलना निकोटीन न दिलेल्या उंदरांच्या पिल्लांशी केली. यात असे दिसून आले की, निकोटीनच्या प्रभावाखालील वडिलांच्या मादी पिल्लांमध्ये इन्सुलिन आणि उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. तर नर पिल्लांमध्ये रक्तातील साखर आणि यकृताच्या कार्यात बदल दिसून आले. हे बदल लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक लिव्हर रोगांसारख्या समस्यांशी संबंधित असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

संशोधकांनी या अभ्यासात केवळ शुद्ध निकोटीनचा वापर केला असल्यामुळे हे परिणाम सिगारेटमधील इतर रसायनांमुळे नव्हे, तर थेट निकोटीनमुळे होत असल्याचेही स्पष्ट झाले.या संशोधनामुळे गर्भधारणेपूर्वी पुरुषांचे आरोग्य आणि जीवनशैली किती महत्त्वाची आहे, यावर पुन्हा एकदा भर देण्यात आला आहे. तंबाखू आणि ई-सिगारेटसारख्या सवयी टाळल्यास भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा