दिवस सातवा : क्रीडा, आदिवासी कल्याण आणि कला-संस्कृतीच्या मागण्यांवर आज होणार चर्चा.

पणजी: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस असून, आजच्या कामकाजात विविध खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चा आणि महत्त्वाच्या विधेयकांचे सादरीकरण होणार आहे. आज प्रामुख्याने क्रीडा आणि युवा व्यवहार, कला व संस्कृती तसेच आदिवासी कल्याण या विभागांच्या वर्ष २०२६-२७ साठीच्या अनुदान मागण्यांवर चर्चा केली जाणार असून त्यानंतर त्यावर मतदान प्रक्रिया पार पडेल. या विभागांच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि भविष्यातील नियोजनावर सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आपली मते मांडतील.
अधिवेशनाच्या सातव्या दिवशी वैधानिक कामकाजांतर्गत नगरविकास मंत्री विश्वजित राणे 'गोवा नगरपालिका (दुरुस्ती) विधेयक २०२६' मांडणार आहेत. नगरपालिका प्रशासनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. याशिवाय, आजच्या कामकाजात एकूण ४९ तारांकित प्रश्नांची नोंद करण्यात आली असून, यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग व व्यापार, वाहतूक, वित्त, आणि पंचायत राज यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे.
प्रश्नोत्तराच्या तासात विशेषतः पुरातत्व, कायदा व न्यायव्यवस्था, अनिवासी भारतीय व्यवहार आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी या क्षेत्रांतील धोरणांबाबत सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. ग्रामीण विकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित कामांवरूनही सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा टप्पा राज्याच्या वार्षिक नियोजनाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असून, विविध लोककल्याणकारी योजनांना मंजुरी मिळवण्यासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण असेल.
दरम्यान कालच निवडणूक आयोगाने चार राज्ये तसेच एक केंद्र शासित प्रदेशांतील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. दिवंगत रवी नाईकांच्या अकाली जाण्याने रिक्त फोंडा विधानसभा मतदारसंघात येत्या ९ एप्रिल रोजी मतदान होईल. काल पत्रकरांनी मुख्यमंत्र्यांना अधिवेशनादरम्यान खात्याच्या मागण्यांसदर्भात काही अडचण येणार का ? याबाबत विचारले असता तरीही याविषयी उद्या निवडणूक आयोगाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. आचारसंहितेच्या तांत्रिक मुद्द्यावर सभापतींनी 'अभ्यास करून निर्णय घेणार' असे स्पष्ट केले, तर मुख्यमंत्र्यांनी 'निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार' असल्याचे सांगितले.
LIVE UPDATES :
११.४७ : खाजगी विधीमंडळ ठरावावेळी विधेयक मांडू न दिल्याने विरोधकांची सभापतींच्या हौद्यात धाव. गदारोळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज अर्धा तास तहकूब.
११.३७ : फोंडा पोटनिवडणुकीमुळे दक्षिण गोव्यात आचारसंहिता लागू असल्याने अर्थसंकल्पीय घोषणांवर निर्बंध येतील, असा मुद्दा विजय सरदेसाईंनी मांडला, यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुपारी संबंधितांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
११.२९ : फोंडा पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे; आता मुख्यमंत्री विविध मागण्या कशा पुरवतात हे पहावे लागेल : व्हेंझी व्हिएगस, बाणावलीचे आमदार.
११.२६ : एखादे खाजगी विधेयक मांड्यांचे झाल्यास त्यामागे भरपूर अभ्यास लागतो. गेल्या चार वर्षांत खाजगी विधेयके मांडण्यात विरोधकांना बराच त्रास सोसावा लागला : वीरेश बोरकर, सांत आंद्रेचे आमदार.
११.१० : फोंडा पोटनिवडणुकीसंदर्भात अद्याप विरोधी पक्षांशी चर्चा झाली नाही. लवकरच होईल अशी अपेक्षा. त्यानंतर तुमच्या (पत्रकारांच्या) समक्ष येऊन बोलू : विजय सरदेसाई, फातोर्डाचे आमदार.
११.०३ : मिराबाग बंधाऱ्याचे काम आता बंद. आता बंद ठेवलेले काम पावसातही बंदच असेल. पुढील निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेऊः सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री.
१०.५७ : सरकारने गेल्या निवडणुकीपूर्वी तीन सिलिंडरचे गाजर दाखवले. आता सिलिंडर सोडाच त्यांनी १६ (ब), १७ (२) आणि ३९ (अ) हे तीन ब्लंडर केलेत : युरी आलेमाव, विरोधी पक्ष नेते.
१०.४८ : जीसीएचा प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वन-म्हावळिंगे येथेच होणार :
प्रेमेंद्र शेट, मयेचे आमदार
१०.४३ : भाजप आणि मगोची युती. फोंडा मतदारसंघात भाजप जो उमेदवार देईल, मगोचा त्याला पाठिंबा असेल : सुदिन ढवळीकर, विजमंत्री.
१०.३८ : सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी चिंबल येथील मेगा प्रोजेक्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, लोकांचा विरोध असल्यास आपण या प्रकल्पाला पाठिंबा देणार नाही आणि मूलभूत सोयीसुविधांशिवाय प्रकल्प नकोच, अशी भूमिका त्यांनी मांडली.