फेसबुकवरून ‘लग्नाचे आमिष’ दाखवून ३.३५ लाखांची फसवणूक

केपे पोलिसांत गुन्हा नोंद

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
42 mins ago
फेसबुकवरून ‘लग्नाचे आमिष’ दाखवून ३.३५ लाखांची फसवणूक

कुडचडे : गोव्यातील (Goa) कुडचडे (Curchorem)  येथील एकाशी फेसबुक (Facebook)  या सोशल मीडियाच्या (Social Media) खात्यावरून मैत्री केली. नंतर लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ३ लाख ३५ हजार ७२० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी केपे पोलिसांत (Quepem Police)  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी केपे मार्केट परिसरात असताना तक्रारदाराला फेसबुकवरील एरीयाना जोनाथन (“Ariana Jonathan”)  या नावाच्या प्रोफाइलवरून संपर्क साधण्यात आला. संबंधित महिलेने आपला मोबाईल क्रमांक शेअर करून व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद सुरू केला. तिने आपण लंडनहून गोव्यात येणार असल्याचे सांगत तक्रारदाराला लग्नाचा प्रस्ताव दिला.

यानंतर ६ मार्च रोजी तक्रारदाराला फोन करून संबंधित महिला दिल्ली विमानतळावर पोहोचल्याचे सांगण्यात आले. विमानतळावरील क्लिअरन्ससाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगून पैसे मागण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये व गुगलवरून एकूण ३,३५,७२० रुपये पाठवले. ही रक्कम मनू कुमार, अभय सिंह आणि अंकित कुमार या नावाच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली.

त्यानंतर आरोपींनी आणखी पैशांची मागणी केली. मात्र; तक्रारदाराने नकार दिल्यानंतर त्यांनी त्याचे फोन व संदेशांना प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केपे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे करीत आहेत.