बचावकार्य सुरू

मनाली : हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मनाली-लेह महामार्गावर अटल बोगदा (Atal Tunnel) परिसरात झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे १,००० हून अधिक वाहने अडकून पडली. अचानक झालेलेल्या बर्फबारीमुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच मनाली पोलीस (Manali Police), सीमा रस्ते संघटना (Border Roads Organisation (BRO)) व इतर एजंसींच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. बर्फ हटवण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. तसेच अडकलेल्या वाहनांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी वाहतूक नियंत्रित करण्यात करण्यात आली.
पथकांच्या तत्पर कारवाईमुळे अडकलेली वाहने हळूहळू मार्गस्थ करण्यात आली. हवामानाची स्थिती लक्षात घेऊन वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कुल्लूमधील उंच भागात जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर, जालोरी खिंडीत अंदाजे ४० ते ५० पर्यटक अडकले. बंजर पोलिसांना दोन डझन पर्यटकांना वाचवण्यात यश आले. आणि उर्वरीत व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय बचाव कार्य सुरू आहे.
मनालीचे पोलीस उपअधीक्षक केडी शर्मा म्हणाले की, अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ते स्वतः बचाव कार्याचे निरीक्षण करत आहेत. "मी माझ्या पोलीस पथकासह घटनास्थळी स्वतः उपस्थित आहे, चालू बचाव कार्याचे पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन करत आहे. सर्व व्यक्तींना मनालीच्या दिशेने सुरक्षितपणे हलवण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत," असे ते म्हणाले.
याव्यतिरिक्त, पोलिसांनी सीमा रस्ते संघटना आणि इतर संबंधित एजन्सींना त्यांच्या पथकांना तातडीने घटनास्थळी पाठवण्याची विनंती केली आहे. कठीण परिस्थितीत पोलिसांनी जनतेकडून सहकार्याची विनंती केली आहे.
"रस्त्यावरील बर्फ माती, यंत्रसामुग्री आणि आवश्यक असल्यास युरिया खत वापरून वितळवून काढण्यात येत आहे. जेणेकरून सर्व अडकलेली वाहने आणि पर्यटक सुरक्षितपणे मनालीच्या दिशेने जाऊ शकतील. आम्ही सर्वांना संयम राखण्याची आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करतो", असे डीएसपी म्हणाले. बचाव कार्य सुरू असल्याने अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.