खाजगी विधेयकांवरून विधानसभेत विरोधकांचा जोरदार गदारोळ; प्रश्नकाळ आणि शून्यकाळ वाया

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20 mins ago
खाजगी विधेयकांवरून विधानसभेत विरोधकांचा जोरदार गदारोळ; प्रश्नकाळ आणि शून्यकाळ वाया

पणजी: गोवा विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या सप्ताहाची सुरुवात अत्यंत वादळी ठरली. सोमवारी सकाळी कामकाज सुरू होताच खाजगी विधेयके मांडू न दिल्याचा आरोप करत विरोधी आमदारांनी सभापतींच्या हौद्यात धाव घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे सभापतींना दोनवेळा कामकाज तहकूब करावे लागले, परिणामी आमदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला प्रश्नकाळ आणि शून्यकाळ पूर्णपणे वाया गेला आहे.

विरोधी आमदारांनी असा दावा केला की, गेल्या शुक्रवारी १५ खाजगी विधेयके स्थगिती प्रस्ताव मांडून चर्चेला घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी कामकाज सल्लागार समितीमध्ये या विधेयकांची यादी तयार करून ती मांडली जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. खाजगी विधिमंडळ ठराव मांडणे हा आमचा घटनात्मक हक्क आहे, अशी आक्रमक भूमिका आमदार युरी आलेमाव यांनी मांडली. मात्र, आश्वासन देऊनही सरकारने या प्रक्रियेत टाळाटाळ केल्याचा आरोप करत विरोधकांनी सभापतींकडे जाब विचारला.

या गदारोळावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांची कृती अनाठायी असल्याचे सांगितले. सोमवार हा दिवस खाजगी विधेयकांसाठी नसून कामकाजाचा दिवस आहे. शुक्रवारी विधेयकांसाठी वेळ निश्चित असतो, तोपर्यंत विरोधकांनी संयम राखायला हवा होता. केवळ सत्ताधारी आमदारांच्या प्रश्नकाळातील वेळ वाया घालवण्यासाठीच हा गोंधळ घातला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधेयकांची तांत्रिक चाचपणी सुरू असून ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाट पाहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.


सभापती गणेश गावकर यांनी सुरुवातीला कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभागृह पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधक आपल्या मागणीवर ठाम राहून हौदात उतरले. गोंधळ थांबत नसल्याचे पाहून सभापतींनी अखेर दुपारपर्यंत अधिवेशन स्थगित केले.