
म्हापसा : गोव्यातील (Goa) बोडगिणी, म्हापसा (Mapusa) येथील कार्व्हालो पेट्रोलपंप (Petrol Pump) जवळील राजेंद्र पांडे यांच्या भंगार अड्ड्याला (Scrapyard) शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या दुर्घटनेत अड्ड्यातील भंगारात काढलेले ५० टक्के साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
ही दुर्घटना आज मंगळवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास घडली. या भंगार अड्ड्यात एक कामगार झोपला होता. शॉर्टसर्किटमुळे आग लागताच सदर कामगाराने आरडाओरड करत अड्ड्यातून बाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत लगेच पाण्याचा फवारा मारत आग नियंत्रणात आणली. तसेच जवळपास ५० टक्के साहित्य आगीची झळ लागण्यापासून वाचवले.
म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश गोवेकर, उपअधिकारी ओंकार कारबोटकर व पर्वरीचे उपअधिकारी संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी आग विझवली. म्हापसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.