
पणजी : मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) हे आधुनिक गोव्याचे (Goa) प्रणेते होते. त्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक विकासकामांचा पाया रचला गेला. गोव्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) तसेच देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांचे कार्य सदैव लक्षात ठेवले जाईल असे मत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
मंगळवारी त्यांनी पर्रीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मिरामार (Miramar) येथील समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्य सचिव व्ही कांदावेलु, पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पर्रीकरांनी त्यांच्या कार्यकाळात गोव्यात नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू केले होते. अभिनव गोष्टी करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभले; ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.आजही देशभरातील लोक जेव्हा मिरामार किनाऱ्यावर येतात तेव्हा ते या समाधी स्थळाला देखील भेट देतात.
त्यांनी नेहमीच जनता, राज्य देशाचा विचार केला. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त गोवा सरकार, गोमंतकीय जनता, भाजपतर्फे आम्ही त्यांना आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या योगदानाची आठवण लोकांच्या मनात कायम राहिली आहे.
राज्यपाल म्हणाले की, मनोहर पर्रीकर आणि मी काही काळ केंद्रीय मंत्रिमंडळात एकत्र काम केले होते. माझ्याकडे त्यांच्या अनेक चांगल्या आठवणी आहेत. त्यावेळी देशात मुलींसाठी सैनिक स्कूल नव्हते. पर्रीकर संरक्षण मंत्री असल्याने आम्ही याबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती.
असे सैनिक स्कूल तसेच एकूणच महिलांना संरक्षण क्षेत्रात अधिक परवानगी द्यावी अशी विनंती आम्ही केली होती. त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आज संरक्षण क्षेत्रात महिला पुरुषांच्या सोबत आहेत. यामध्ये पर्रीकरांचे मोठे योगदान आहे.