
नवी दिल्ली : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात ४०० जण ठार तर २५० हून अधिक गंभीर जखमी झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा निषेध करीत कडाडून टीका केली आहे. पाकिस्तानबरोबर आता चर्चेची वेळ संपली आहे. या क्रूर हल्ल्याचा अफगाणिस्तान नक्कीच सूड घेणार असून, थेट इस्लामाबादला लक्ष्य करण्याचा इशारा देत इस्लामाबादसहीत पाकिस्तानातील अनेक ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांतील युद्ध आणखी भडकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानने हवाई हल्ला केल्यानंतर 'इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान'चे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद आक्रमक बनले आहेत. एका वृत्तसंस्थेला माहिती देताना त्यांनी सांगितले की, पाकिस्तानबरोबर चर्चेची वेळ संपली आहे. क्रूर हल्ल्याचा बदला नक्कीच घेऊ. डूरंड लाईनवर दोन्ही देशांच्या सेना आमनेसामने आल्या आहेत.
काबूलवरील हल्ल्याच्या काही तासातच तालिबानने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानचा महत्त्वाचा 'नूर खान एअरबेस' लक्ष्य करण्याबरोबरच क्वेटा, इस्लामाबाद, रावळपिंडी येथील पाक लष्कराच्या तळांना लक्ष्य केले आहे.
पाकिस्तानने काबूल आणि नंगरहारमधील हल्ल्यांना 'स्वसंरक्षणार्थ केलेली कारवाई ' संबोधले आहे. तालिबानच्या या दाव्यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. दोन्ही देशांमधील लष्करी कारवाई तीव्र झाली आहे. अफगाण संरक्षणमंत्र्यांनी पूर्वीच इशारा दिला होता की, काबूलवर हल्ला झाला तर पुढील लक्ष्य इस्लामाबाद असेल.
भारताकडून पाकिस्तानचा कडाडून निषेध
दरम्यान, भारताने या घटनेचा निषेध करत म्हटले आहे की, “नागरिकांच्या जीवावर उठणारी ही भ्याड आणि अमानुष हिंसा असून, याला कोणत्याही प्रकारे लष्करी कारवाईचे स्वरूप देता येणार नाही. पाकिस्तानने या हत्याकांडाला लष्करी कारवाईचे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे,” अशी तीव्र टीका करण्यात आली.