डिचोलीतील वडील-मुलाच्या मृत्यूप्रकरणात नवा खुलासा

पणजी : गोव्यातील (Goa) नाईकनगर-बोर्डे, डिचोली (Bicholim) येथील वडील (Father) आणि मुलाच्या मृत्यूप्रकरणात जन्मदात्या वडिलांनीच मुलाचा खून (Murder) केल्यानंतर विषप्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) (GMC) रुग्णालयात या दोघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. यात संजय म्हापसेकर यांनी विष प्राशन केल्याने तर मुलाचा खून गळा दाबून झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले.
वडील व मुलगा या दोघांच्या मृत्यूप्रकरणामुळे डिचोलीसह गोव्यातही खळबळ माजली आहे. दरम्यान सापडलेली चिठ्ठी वडिलांनीच लिहिल्याचे समोर आले. खून करण्यापूर्वी घराच्या पुढील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि मागील दरवाजाची कडी ओढून घेऊन मुलाचा खून केल्याचे तपासत समोर आले.
सोमवारी रात्री उघडकीस आली घटना
सोमवारी रात्री वडील संजय म्हापसेकर आणि मुलगा संचित म्हापसेकर या दोघांचे मृतदेह एकाच खोलीत आढळून आले होते, ज्यामध्ये मुलगा खोलीतील कॉटवर तर वडील जमिनीवर पडलेल्या अवस्थेत होते. सोमवारी संध्याकाळी मुलगी कामावरून घरी परतल्यानंतर दोघेही निपचित पडल्याचे दिसून आले आणि मृत पावल्याचे उघड झाल्यानंतर मृतदेह बांबोळीतील गोमेकॉत पाठवण्यात आले, ज्यावर आज, मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले.
दरवाजाला बाहेरून कुलूप लावून कृत्य
वडिलांनी खून करण्यापूर्वी घराच्या पुढील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि मागील दरवाजाची कडी ओढून घेऊन मुलाचा खून केला व नंतर आपण विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, असा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. मुलगी घरी आल्यावर तिने स्वतःकडील चावीने कुलूप उघडून आत प्रवेश केला आणि आतील दृश्य पाहिल्यानंतर तिने आपल्या मामांना माहिती दिली, ज्यांनी स्थानिकांच्या मदतीने घरात जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह आढळून आले व त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
बारा पानी चिठ्ठी अन् पोलिसांचा तपास
घटनास्थळी वडील म्हापसेकर यांनी लिहिलेली बारा पानी चिठ्ठी सापडली असून; त्याची पडताळणी पोलीस अधिकारी करत आहेत. वडिलांनीच मुलाचा खून करून आत्महत्या केली की यात आणखी काही वेगळा प्रकार आहे, याचाही शोध घेण्यासोबतच पोलिसांनी कुटुंबीय आणि शेजारी यांच्याकडून माहिती घेऊन या प्रकरणाचा चारही बाजूंनी तपास चालवला आहे.
मुलाची पोलिसांत होती तक्रार
वडील आपल्याला मारत असल्याची तक्रार मुलाने काही दिवसांपूर्वी पोलीस स्थानकात केली होती. तसेच, मुलगा आपले ऐकत नव्हता असे वडिलांनी लिहिलेल्या शेवटच्या चिठ्ठीत नमूद केल्याचे दिसून आले आहे आणि या अशाप्रकारच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.