४० वर्षांवरील महिलांची कॅन्सर, हायपरटेंशनसह इतर आजारांची मोफत तपासणी

पणजी : महिलांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याच्या ‘चेक्ड बाय डॉक्टर’ मोहिमेअंतर्गत गेल्या ८ दिवसांत १६,५६० महिलांची तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य खात्याकडून ही माहिती देण्यात आली.
जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या योजनेची घोषणा केली होती. ४० वर्षांवरील महिलांसाठी कॅन्सर, हायपरटेंशन यासह इतर आजारांची मोफत तपासणी करणारी ही योजना सुरू झाली आहे. आरोग्य केंद्रे, जिल्हा इस्पितळे तसेच जीएमसीमध्ये मोफत तपासणीची व्यवस्था आहे. प्रत्येक तालुक्यातील एका खासगी रुग्णालयातही सवलतीच्या दरात तपासणीची सोय उपलब्ध करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले होते.
‘चेक्ड बाय डॉक्टर’ मोहिमेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १६,५६० महिलांनी मोफत तपासणी करून घेतली आहे. यापैकी १६ मार्च रोजी २,२८० महिलांची तपासणी झाली. हायपरटेंशनसाठी ११,७५८, मधुमेहासाठी १०,४४३, स्तनाच्या कर्करोगासाठी ५,४८४, तर मुखाच्या कर्करोगासाठी ६,३४१ जणींची तपासणी करण्यात आली. याव्यतिरिक्त आयुष इस्पितळात ५,०१९ महिलांची तपासणी झाली आहे. हिमोग्लोबिनसाठी ६,४५९, तर ॲनिमियासाठी १,२१७ जणींवर उपचार करण्यात आले.
समुपदेशन, उपचारांचीही सुविधा
या मोहिमेअंतर्गत केवळ मोफत तपासणीच नाही, तर आरोग्यविषयक समुपदेशन आणि आजारांवरील उपचारही केले जात आहेत. ६,३८३ महिलांचे आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले. १,०४१ महिलांना कॅल्शियमच्या तर १,१८८ महिलांना आयर्नच्या गोळ्या देण्यात आल्या. ८९४ महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.