कवळे मठाच्या खानापूर येथील जमिनीवर अतिक्रमण!

मठाधीश श्री श्री शिवानंद स्वामी : सर्व्हे क्र. ४०, ४५ मध्ये बेकायदेशीर प्रवेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30 mins ago
कवळे मठाच्या खानापूर येथील जमिनीवर अतिक्रमण!

बेळगाव : कवळे मठाच्या मालकीच्या खानापूर येथील जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणाबाबत मठाचे ७७वे मठाधीश श्री श्री शिवानंद स्वामी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

यावेळी मठाचे शरद केशकामत, ॲड. प्रद्युम्न भाटे, ॲड पद्मा हल्याळी, नीलेश बोरकर, सुहास देशपांडे, प्रकाश देशपांडे व इतर सदस्य उपस्थित होते.

श्री श्री शिवानंद स्वामी म्हणाले की, सर्वेक्षण क्र. ३०, ३८, ४० आणि ४५ या जमिनी कवळे मठाच्या मालकीच्या असून, त्या १९२१ साली ‘द पायोनियर क्ले अँड इंडस्ट्रीज वर्क्स लिमिटेड’ या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. त्यावेळी कंपनीचे संचालक खानापूर येथीलच होते. कालांतराने व्यवस्थापनात बदल झाले आणि बाहेरील व्यक्तींचा समावेश करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे त्यांनी सांगितले की, १९६० साली भाडेपट्टा संपल्यानंतर मठाने जमीन परत मागितली होती. मात्र, ती न मिळाल्याने न्यायालयीन लढा द्यावा लागला. १९७० साली दिवाणी न्यायालयात तडजोड हुकूमनामा झाला. त्यानुसार ३१ डिसेंबर २०१७ नंतर जमीन मठाकडे परत देणे बंधनकारक होते, असे स्वामींनी नमूद केले.

स्वामींनी सांगितले की, ६ फेब्रुवारी २०२१ रोजी जमिनींचा ताबा मठाकडे अधिकृतरीत्या सुपूर्द करण्यात आला असून, सध्या त्या जमिनीवर कृषी व फलोत्पादन उपक्रम सुरू आहेत.

मात्र, न्यायालयीन निर्देश अस्तित्वात असतानाही अतिक्रमण झाल्याचा आरोप करताना स्वामी म्हणाले, हुबळी येथील कंदी रविकुमार यांनी ५० ते ६० लोकांसह सर्वेक्षण क्रमांक ४० आणि ४५ मध्ये बेकायदेशीर प्रवेश केला आहे. त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचे आणि ‘भीमसेना अध्यक्ष, कर्नाटक राज्य’ असे फलक लावले आहेत. ही कृती कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी आहे.

कंपनीकडून काही व्यक्तींना सामान्य मुखत्यारपत्र देऊन राजकीय प्रभावाचा वापर करून सरकारी यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

या प्रकरणामुळे देशभरातील कवळे मठाचे भक्त अस्वस्थ झाले असून, न्याय मिळावा यासाठी मोठ्या संख्येने खानापूर येथे येण्याची शक्यता असल्याचे स्वामींनी सांगितले. आम्ही न्यायालय, प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे योग्य कारवाईची अपेक्षा करतो, असे ते म्हणाले.

पोलिसांच्या भूमिकेवर शंका

या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे. तरीही कोणतीही कारवाई किंवा एफआयआर नोंदवण्यात आला नाही. यामुळे पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल गंभीर शंका निर्माण होत आहे, असे श्री श्री शिवानंद स्वामी यांनी सांगितले. 

हेही वाचा