फार्मसीच्या माजी महिला कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

म्हापसा : कळंगुटमधील अबानिया ड्रग स्टोअर्स या फार्मसीचा क्यूआर कोड स्कॅनर बदलून आपला स्कॅनर वापरून एका महिला कामगाराने मालकाला ४९.६८ लाख रुपयांना गंडा घातला. या फसवणूक प्रकरणी पेडणे तालुक्यातील सदर माजी कामगार महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
याप्रकरणी फार्मसीचे मालक यतीन नाईक (रा. म्हापसा) यांनी कळंगुट पोलिसांत तक्रार दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार फेब्रुवारी २०२० ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडला.
संशयित महिलेने ऑक्टोबर २०२५ मध्ये अचानकपणे नोकरी सोडली. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. संशयित महिलेने दुकानाच्या व्यवहारांसाठी वापरला जाणारा इंडियन ओव्हरसीस बँकेचा अधिकृत क्यूआर स्कॅनर जाणीवपूर्वक काढून टाकला. त्यानंतर तिथे स्वत:च्या बँक खात्याशी जोडलेला तिचा वैयक्तिक स्कॅनर तिथे लावला आणि ग्राहकांकडून येणारी देयके वळवून स्वत:च्या वैयक्तिक खात्यात जमा करून घेतली.
ही रक्कम वेगवेगळ्या दोन बँक खात्यात जमा केली. तसेच सत्तरी सहकारी बँकेमध्ये एक अनधिकृत पिग्मी खाते उघडले आणि त्याद्वारे एकूण ४९ लाख ६८ हजार रुपये रकमेची अफरातफर करत विश्वासघात केला.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३१६(४) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परेश सिनारी हे करीत आहेत.