‘कुराण’ची शपथ घेऊन विवाहाचा दावा; महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा निर्दोष

संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th March, 11:48 pm
‘कुराण’ची शपथ घेऊन विवाहाचा दावा; महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा निर्दोष

पणजी : ‘कुराण’ ग्रंथाची शपथ घेऊन विवाह केल्याचा दावा करून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. लैंगिक संबंध हे फसवणुकीद्वारे किंवा लग्नाच्या खोट्या आश्वासनाद्वारे करण्यात आल्याचे सिद्ध करण्यास अपयश आले आहे, असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील जलदगती न्यायालयाने मूळ उत्तरप्रदेशातील ३१ वर्षीय संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.

पीडित महिलेने ११ मे २०२२ रोजी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार,ऑक्टोबर २०१९ ते ३० जानेवारी २०२२ या कालावधीत, डिचोली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दुकान मालकाने तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला. याची दखल घेऊन पोलिसांनी संशयिताला २० मे २०२२ रोजी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने १४ जून २०२२ रोजी त्याची जामिनावर सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून ५ जुलै २०२२ रोजी न्यायालयात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन ९ मे २०२४ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला.

न्यायालयात सुनावणी झाली असता, पीडित महिलेची उलटतपासणी घेण्यात आली. त्यात संशयिताने तिला पवित्र कुराणावर हात ठेवून शपथ घेतली आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. त्यामुळे ती त्याची कायदेशीररित्या विवाह झालेली पत्नी आहे, असा तिचा समज झाला होता. तसेच २०२२ च्या सुरुवातीला जेव्हा संशयित पळून आपल्या मूळ गावी गेला. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्याला जाब विचारला असता, त्याने कोणताही विवाह झाला नसल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्याचा जबाब उलटतपासणीत दिला.

संशयितातर्फे अॅड. रोहन देसाई यांनी बाजू मांडली. महिलेने संशयिताकडून उसणे पैसे घेतले होते. त्याची मागणी केल्यानंतर महिलेने संशयिताविरोधात तक्रार दाखल केल्याचा दावा केला. तसेच या संदर्भात संशयिताच्या पत्नीने दिलेली साक्ष न्यायालयात ठेवली.

दोघांतील संबंध परस्परसंमीने असल्याचे निरीक्षण

पीडित महिलेला संशयित विवाहित असल्याची माहिती होती. तसेच मुस्लीम विवाह कशाप्रकारे पार पडतात, याची तिला माहिती होती. केवळ कुराणावर हात ठेवल्याने दोन व्यक्तींचा विवाह होत नाही आणि कोणताही सुज्ञ व्यक्ती अशा प्रकारच्या विधीमुळे फसवला गेला नसता. आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील संबंध हे परस्परसंमतीने होते आणि ते जवळपास तीन वर्षे टिकले असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने पुराव्या अभावी संशयिताला लैंगिक अत्याचार प्रकरणी निर्दोष सुटका केली. 

हेही वाचा