मारामारीत तिघे जखमी : संबंधित पथकांवर भविष्यात प्रवेशबंदी

वाळपई : गोवा पर्यटन खाते, गोवा पर्यटन महामंडळ आणि सत्तरी तालुका समिती यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय पातळीवरील शिगमोत्सवात गोव्यातील आघाडीच्या दोन रोमटामेळ पथकांमध्ये पूर्ववैमनस्यातून अचानक वाद निर्माण होऊन मारामारीचा प्रकार घडला. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, हा वाद शिगमोत्सव समितीने योग्यप्रकारे हाताळल्यामुळे शिगमोत्सवाचा समारोप शांततेत करण्यात आला.
वाळपई येथील शिगमोत्सवात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, त्या दोन्ही पथकांना भविष्यात वाळपई येथे होणाऱ्या शिगमोत्सवात प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय समितीने घेतला असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तसेच वाद निर्माण होऊनही हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिगमोत्सवप्रेमींनी पहाटेपर्यंत संयम राखून सहकार्य केल्याबद्दल समितीने सर्वांचे आभार मानले आहेत.
दि. १६ मार्च रोजी वाळपई येथे शासकीय पातळीवर शिगमोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रोमटामेळ स्पर्धा सुरळीत सुरू असताना अनेक पथकांनी प्रभावी सादरीकरण केले. मात्र, त्यानंतर गोव्यातील आघाडीच्या दोन रोमटामेळ पथकांतील कलाकारांमध्ये अचानक वाद निर्माण झाला. या वादामुळे वाळपई येथील अवरलेडी हायस्कूलसमोर दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा वाद मारामारीत परिवर्तित झाला. या मारामारीत तिघेजण जखमी झाले असून त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.
शिगमोत्सव बंद करण्याचे पोलिसांचे आवाहन
या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शिगमोत्सव बंद करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, समितीने त्यास तीव्र आक्षेप घेतला. हा वाद दोन रोमटामेळ पथकांमधील असून त्याचा आयोजन समितीशी संबंध नसल्याचे समितीने स्पष्ट केले.
वाद निर्माण झाला त्यावेळी आठ गटांचे सादरीकरण पूर्ण झाले होते, तर तीन पथकांचे सादरीकरण बाकी होते. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि उर्वरित पथकांची सादरीकरणे पूर्ण करून स्पर्धेचा समारोप यशस्वीपणे करण्यात आला.
संबंधित पथकांवर भविष्यात बंदी
ज्या दोन रोमटामेळ पथकांनी वाळपईतील शिगमोत्सवात वाद निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, त्या दोन्ही पथकांना भविष्यात वाळपई येथे होणाऱ्या शिगमोत्सवात सहभागी होण्यास बंदी घालण्याचा निर्णय सत्तरी शिगमोत्सव समितीने घेतला आहे.