१९ मार्च २०१९ रोजी घेतली होती पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले डॉ. प्रमोद सावंत (Goa Chief Minister Pramod Sawant) गुरुवारी, १९ मार्च रोजी ७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. १९ मार्च २०१९ रोजी त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही तेच राज्याचे मुख्यमंत्री बनले.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची मंगळवारी पुण्यतिथी होती. मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्च २०१९ रोजी निधन झाल्यानंतर १९ मार्च २०१९ रोजी डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते विधानसभेचे सभापती होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भारतीय जनता पक्षासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात सर्वाधिक काळ भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा मान डॉ. प्रमोद सावंत यांनाच जातो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदापासून सुरू झाली. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून त्यांनी भामई-पाळी येथे प्रॅक्टिसही केली आहे. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून सरकारी नोकरी सोडून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
पाळी मतदारसंघाचे तत्कालीन काँग्रेस आमदार गुरुदास गावस यांच्या आकस्मिक निधनामुळे तिथे पोटनिवडणूक झाली होती. नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या या पोटनिवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत भाजपचे उमेदवार होते, मात्र काँग्रेसच्या प्रताप गावस यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानेच त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली.
पाळी मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी
साखळी (पूर्वीचा पाळी) मतदारसंघातून २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत पहिल्यांदा विजयी झाले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आले. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ते सभापती झाले. सभापती असतानाच पर्रीकर यांच्या निधनामुळे त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यांच्याच नेतृत्वाखाली २०२२ ची विधानसभा निवडणूक होऊन भाजपला बहुमत मिळाले आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्या ते मुख्यमंत्रीपदाची सात वर्षे पूर्ण करत आहेत.