पाच दिवसांपासून लोक आजारी : दीडशेपेक्षा अधिकजणांना अतिसार, उलट्या

दूषित पाण्याविषयीची माहिती देताना दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा इमारतीचे रहिवासी.
वास्को : दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा इमारतीतील पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळल्याने गेल्या पाच-सहा दिवसांत दीडशेपेक्षा अधिक रहिवाशांना अतिसार, उलट्या व अशक्तपणाचा त्रास होऊन उपचार घ्यावे लागले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये ही लक्षणे आढळल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिण्याच्या पाण्यात सांडपाणी नेमके कोठून मिसळले, याचा शोध सुरू असून, बोअरवेलमधून सांडपाणी भूमिगत टाकीत गेले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परिसरातील पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांची भीती अधिक वाढली आहे. या दूषित पाण्यामुळे कितीजण आजारी पडले आहेत, यासंबंधी माहिती घेतली जात आहे. दरम्यान, काहीजण चिखली उपजिल्हा इस्पितळ, तसेच खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच कुठ्ठाळी आरोग्य केंद्राने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने इमारत परिसरातील बोअरवेल, जलवाहिन्या, भूमिगत टाकी व इमारतीवरील टाक्यांमधील पाण्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहेत. दूषिततेचे कारण स्पष्ट होईपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, रहिवाशांना उकळलेले पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काही रहिवाशांनी पोलीस स्थानकात तसेच मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. करमली यांनी प्रकरणावर लक्ष ठेवून पाणीपुरवठा विभागाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
रहिवाशांची धावपळ
सुमारे ३५० सदनिकांमध्ये हजाराच्या आसपास रहिवासी असलेल्या या इमारतीत पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तथापी पाण्याअभावी त्यांच्या इतर दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे काहींनी सांगितले.
सांडपाणी प्रकल्पावर संशय
इमारती परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातूनच दूषितता झाली असावी, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रकल्पाची देखभाल कोणाकडे आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रारही रहिवाशांनी केली असून स्वच्छ व सुरक्षित पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.