राजकारण्यांपासून सिने अभिनेत्यांपर्यंत लागेबांधे, ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त, आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ व भविष्यवक्ता म्हणवणाऱ्या अशोक खरात याला एका ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून नाशिक येथील सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असता आरोपीच्या कार्यालयातून धक्कादायक पुरावे समोर आले.त्याला न्यायलयासमोर उभे केले असता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
तपासादरम्यान पोलिसांना खरातच्या कार्यालयातून एक पेन ड्राइव्ह सापडली, ज्यामध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. या व्हिडिओंमुळे महिलांना जाळ्यात अडकवून त्यांचे चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, खरातने आपल्या कार्यालयात गुप्तपणे कॅमेरे बसवले होते. तो महिलांना भविष्याची भीती दाखवून किंवा प्रलोभने देऊन त्यांच्याशी गैरवर्तन करत असे आणि त्याचे चित्रीकरण करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारातून ‘हनी ट्रॅप’चे जाळे उभारले असल्याची शक्यता तपासली जात आहे.
अशोक खरात याचे अनेक राजकारणी व सेलिब्रिटींशी संबंध असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जप्त केलेल्या व्हिडिओंमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात असून, यामुळे अनेक ठिकाणी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक क्राइम ब्रांच या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. कॅप्टन उर्फ अशोक खरात (Ashok Kharat) हा अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळे भविष्याविषयी मार्गदर्शन घ्यायला त्याच्याकडे अनेक बड्या व्यक्ती येत असत. यामध्ये बडे राजकारणी, उद्योगपती आणि नामवंत सेलिब्रिटींचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यासोबतचे अशोक खरात याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बुधवारी सकाळीच रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरल्याचा फोटो समोर आला होतो. यानंतर त्यांचा आणखी एक धक्कादायक फोटो समोर आला आहे. यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाद्यपूजन करताना दिसत आहेत. या फोटोमुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीने एका भोंदूबाबाच्या इतक्या आहारी जाणे आणि ज्या व्यक्तीकडे अत्याचारित महिलांना न्याय देण्याची जबाबदारी आहे, त्यानेच अशाप्रकारचे कृत्य करणे कितपत बरोबर आहे, असा सवाल आता विचारला जात आहे.
संशयिताची पार्श्वभूमी
खरात स्वतःला मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी असल्याचा दावा करत होता. त्याने २२ वर्षे विविध देशांत प्रवास केल्याचे सांगितले होते. निवृत्तीनंतर ब्रह्मांडाच्या अभ्यासाकडे वळून ज्योतिष व अंकशास्त्रात प्राविण्य मिळवल्याचा दावा तो करत असे. तसेच ‘शिवनिका ट्रस्ट’चा प्रमुख म्हणूनही तो कार्यरत होता आणि एका मंदिराच्या व्यवस्थापनाशीही त्याचा संबंध होता.