
तेहरान : इराणमधील (Iran) प्रभावशाली राजकारणी तथा राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख आणि सत्तेच्या आडून सूत्रे हलवणारे नेते अली लारिजानी (Ali Larijani) यांचा अमेरिका-इस्रायली (USA-Israel) हवाई हल्ल्यात (Airstrike) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
६७ वर्षीय लारिजानी तेहरानच्या उपनगरातील आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले असताना हा हल्ला झाला. इस्रायलचे संरक्षणमंत्री (Defence Minister) इस्राएल कॅट्झ यांनीही या कारवाईत त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
सत्ताकेंद्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व
लारिजानी हे इराणच्या इस्लामी प्रजासत्ताकातील अत्यंत प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जात होते. ते सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निकटवर्तीय सल्लागार होते. सुरक्षा धोरणांचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख होती.
१९८० च्या दशकातील इराण-इराक युद्धात त्यांनी रिव्होल्यूशनरी गार्डमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे राष्ट्रीय प्रसारण प्रमुख, सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि तब्बल १२ वर्षे संसद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.
मध्यममार्गी प्रतिमा, तरीही वादग्रस्त भूमिका
लारिजानी यांची प्रतिमा व्यवहारकुशल आणि काहीशी मध्यममार्गी अशी होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर ते चर्चेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या बाजूने असल्याचे दिसून आले. मात्र, जानेवारी महिन्यातील आंदोलनांचे दडपशाहीने केलेले दमन यात त्यांची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप आहे. या कारवाईत हजारो आंदोलकांचा मृत्यू झाल्याने अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंधही लादले होते.
अणु धोरण आणि प्रादेशिक संबंधांमध्ये भूमिका
इराणच्या अणु कार्यक्रमाच्या धोरणात लारिजानी यांचा मोठा वाटा होता. आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून अणु क्षमता विकसित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच, पश्चिम देशांशी चर्चा करताना ते खामेनेई यांचे विचार प्रभावीपणे मांडत असत.
क्रांतीनंतरचा उदय
१९५८ साली इराकमधील नजफ येथे जन्मलेले लारिजानी लहानपणीच इराणमध्ये आले. तत्त्वज्ञानात पीएचडी मिळवलेले लारिजानी धार्मिक व राजकीय वातावरणात वाढले. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य सत्तेच्या उच्च पदांवर पोहोचले.
बदलत्या सत्तासमीकरणात घटले महत्त्व
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमधील सत्तासंतुलन बदलत गेले. रिव्होल्यूशनरी गार्डचा प्रभाव वाढल्याने लारिजानी यांसारख्या राजकीय नेत्यांचे महत्त्व कमी होत असल्याचे निरीक्षकांचे मत होते.
दरम्यान, त्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या राजकीय आणि धोरणात्मक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मानले जात आहे.