गुजरात विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क, तपास सुरू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26 mins ago
गुजरात विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क, तपास सुरू

अहमदाबाद : गुजरात विधानसभेला (Gujarat Assembly) बुधवारी (१८ मार्च) ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची (Bomb blast) धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. धमकीचा ई-मेल (Email) मिळताच पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आमदार आणि मंत्र्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.


संपूर्ण विधानसभेची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून पुन्हा कामकाज सुरू करण्यात आले.

शाळांनाही धमक्या

दरम्यान, शहरातील काही शाळांना (School) देखील अशाच प्रकारच्या स्फोटाच्या धमक्या देणारे ई-मेल पाठवण्यात आल्याने; पोलीस यंत्रणा सतर्क झाली. बोर्ड परीक्षांच्या शेवटच्या दिवशी ही घटना घडल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

समान नागरी कायदा विधेयकाच्या प्रस्तावावर चर्चा 

दरम्यान, सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) काल कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत समान नागरी कायदा (UCC) विधेयक सादर करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. २५ मार्च रोजी हे विधेयक सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. १६ फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे.

सायबर टीमकडून तपास वेगात

या धमकीच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक रवी तेजा वासमशेट्टी यांनी सांगितले की, “विधानसभेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर इंग्रजीतून जीमेल (Gmail) द्वारे धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू असून; लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल.”

ते पुढे म्हणाले, “यापूर्वी अशा प्रकारच्या ई-मेलशी याचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून; ई-मेलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर टीम कार्यरत आहे.”

हेही वाचा