फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार : पाशेको

सध्याच्या स्थितीत विरोधकांची युती शक्य नाही

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार : पाशेको

मडगाव : भाजप (BJP) नको असल्यास लोकांना योग्य पर्याय देण्याची गरज आहे. काँग्रेसवर (Congress) लोकांचा विश्वास राहिलेला नाही. काही समविचारी लोक एकत्र आलेले आहेत.  दोन पक्षांशी चर्चा सुरू असून राज्यभरात काम करणार. फोंडा (Ponda) विधानसभा (Assembly) पोटनिवडणुकीसाठी  (By-election) उमेदवार उभा केला जाईल, अशी माहिती माजी मंत्री मिकी पाशेको यांनी दिली. 

 मडगाव (Margao) येथे पत्रकार परिषद घेत माजी मंत्री मिकी यांनी विरोधी पक्षांची एकी होत नाही व काँग्रेसवरही लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे योग्य पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांनी पाच वर्षांत काय केले याची माहितीही लोकांनी घ्यावी. ज्यांना लोकांनी निवडून दिलेले होते ते कार्यक्षम नसल्याने लोकांना रस्त्यावर येण्याची गरज पडली. 

 एकमेकांवर आरोप करणार्‍या विरोधी पक्षांची सध्याची स्थिती पाहता आगामी काळात विरोधकांची एकी होईल असे दिसत नाही. काँग्रेस, आरजी यांनाही विरोधी पक्षांची युती नको असे दिसते. विरोधी सात आमदार आहेत. त्यातील आप व आरजीचे आमदार वेगळे राहतात. काँग्रेस व गोवा फॉरवर्डची युती असतानाही त्यांच्यात एकजूट नाही. या आमदारांमध्ये केवळ विजय सरदेसाई हेच वरिष्ठ सदस्य आहेत. विधानसभेत चर्चा होण्याची गरज असतानाही कायम गोंधळ घालायचा व बाहेर पडायचे व सत्ताधार्‍यांना मार्ग मोकळा करून देण्यात आला. मिराबाग बंधार्‍यासाठी आमदार व मंत्री सहकार्य करत असतील तर लोकांनी त्यांच्या घरी जात विचारणा करण्याची गरज आहे. स्थानिक लोकांनी याचा विचार करत बाहेरील लोकांना गोळा न करता आमदारांवर प्रकल्प रद्दसाठी दबाव आणावा, असे सांगितले.

 अर्थसंकल्पावर चर्चा होण्याची गरज असतानाही विधानसभा सभागृहाबाहेर पडणे हे योग्य नाही. सर्व विरोधी आमदारांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेण्याची गरज होती. लोकशाहीचे काही नियम असतात त्याचे पालन होण्याची गरज होती. राज्यातील विरोधी पक्षांची स्थिती पाहता सध्या राजकीय युती असल्याचे दिसत नाही. यापूर्वीही गरजेनुसार तात्पुरती युती होत असताना दिसून आली. विरोधी पक्षांनी पणजी नगरपालिका एकत्रित लढवली पण केवळ तीन जागा जिंकता आल्या. यातच विरोधकांचे अपयश दिसून येते.

   सभागृहात सरदेसाई चर्चेसाठी राहिलेले असल्याने त्यांनी सरकारशी हातमिळवणी केल्याची टीका आमदार वीरेश बोरकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. खरेतर गोव्याच्या लोकांसाठी विरोधी आमदारांनी गोंधळ घालण्याऐवजी चर्चा करण्याची गरज होती. मात्र, तसे झालेले नाही उलट विरोधी आमदारांवरच टीका केली जाते. युतीही टिकवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. 

 आमदार विरेश बोरकर यांनी केलेले आंदोलन हे योग्य कारणासाठी होते पण कुठल्याही सरकारी कार्यालयात ठिय्या मांडणे हे योग्य नाही. त्यांनी कार्यालयाबाहेर किंवा आझाद मैदानावर आंदोलन करण्याची गरज आहे. आंदोलन जर राज्यातील जमिनी राखण्यासाठी होते तर केवळ सांत आंद्रेतील प्रकल्प स्थगित केल्यानंतर आंदोलन मागे का घेण्यात आले, असा सवालही केला.

 काँग्रेसने फोंडा पोटनिवडणुकीसाठी मागील निवडणूक लढणार्‍या राजेश वेरेकर यांना बाजूला ठेवत पक्षाच्या कार्यकर्त्यावर अविश्वास दाखवला. आताच पक्षात आलेल्या भाटीकर यांना उमेदवारी देण्यात आली. भाजप पक्ष स्वयंसेवक संघ चालवतो असे काँग्रेस सांगत असतो. तर याच आरएसएसचा सदस्य असलेल्या डॉ. केतन भाटीकर यांना पक्षात घेत उमेदवारी का देण्यात आली. 

आठ ते नऊ महिने निवडणुकांसाठी उरलेले आहेत. याचा कोणता परिणाम राज्यातील काँग्रेसला सहकार्य करणार्‍यांवर होणार याचा काँग्रेसने विचार करण्याची गरज आहे, असेही माजी मंत्री मिकी पाशेको यांनी सांगितले. काँग्रेसला निवडणुकांसाठी चर्चा करण्यासाठी दिलेला वेळ संपुष्टात आलेला आहे. लोकांना भाजप नको असल्यास त्यांना योग्य पर्याय मिळण्याची गरज आहे. त्यासाठी दोन पक्षांशी बोलणे सुरू असून, फोंडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला जाईल, असेही सांगितले.


हेही वाचा