आज काळ बदलला, तरी पोर्तुगीज अामदानीतील क्राॅसचे पूजन, ख्रिस्ती देवदेवतांना नमन घालण्याची परंपरा कायम राखलेली आहे. जागोराची नावशी आणि काक्रा येथील परंपरा हिंदू-ख्रिस्ती संचितांतून निर्माण झालेल्या संकराचे आणि एकात्मतेचे दर्शन घडवते.

शेकडो वर्षांच्या इतिहासाची परंपरा असणारा गावडा जागोराचा लोकनाट्याचा आविष्कार विस्मृतीच्या उदरात गडप झालेल्या नावशी गावातल्या इतिहास आणि संस्कृतीच्या नाना विविध पैंलूचे अत्यंत सुंदररीत्या दर्शन नृत्य, नाट्य, गायन आणि वादनाच्या समृद्ध परंपरेतून घडवत आहे.
पोर्तुगिजांनी सोळाव्या शतकात जुन्या काबिजादीत समावेश होणाऱ्या तिसवाडीतल्या ज्या प्रांतांवर आपली सत्ता प्रस्थापित केली, तेथे त्यांनी भूमीपुत्रांची धार्मिक आणि सांस्कृतिक संचिते उद्धवस्त करण्याचे षडयंत्र यशस्वी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु असे असतानाही कष्टकरी समाजाने आपली लोक संस्कृतीजतन करण्यासाठी तितकाच अपरिमित असा लढा झुंजारपणे दिला. त्यामुळे आजही बांबोळी येथील गोवा विद्यापीठापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नावशी आणि काक्रा येथील नवहिंदू गावडा जमातीत जागर लोकनाट्य परंपरेच्या वैविध्यपूर्ण परंपरेचे दर्शन घडते.
वैशाखाचा वणवा कार्यान्वित झाला आणि लईराईची शिरगाव येथील जत्रा संपन्न झाली की, काक्रा आणि नावशी या सागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या आणि बेशिस्त सागरी पर्यटनाची शिकार झालेल्या आदिवासी जमातीला जागोराच्या लोकनाट्याचे वेध लागतात आणि मे महिन्यातला दुसरा शनिवार आणि रविवाराच्या रात्री कर्णमधूर अशा लोकसंगीताने संस्मरणीय होऊ लागतात.
ब्रम्हदेव, विष्णू आनी शंकर
तिगूय मेळून गा एक दत्तगुरु
दत्तगुरु तुका नमन..........
घुमटसारख्या पारंपरिक चर्मवाद्यांवर वादक विशिष्ट शैलीत ठेका धरतात. कासाळ्यांचा निनाद आणि या सुरेल लोकसंगीतावरील लोकगीते श्रोत्यांना जागोर लोकनाट्यातील विविध पात्रांकडे लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडतात. जागरातील ठराविक पात्रे परंपरेने जमातीतील कोणी करावी हे पूर्वापार ठरलेले असते आणि प्रत्येकजण मांडागुरुची कृपा लाभावी म्हणून विधीनाट्यातून धर्म, संस्कृती यांच्या मूल्यांचे पालन करताना मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाला प्राधान्य देतात. गावडा जागोराची परंपरा एकेकाळी उत्तर गोव्यातल्या बऱ्याच गावांत रुढ होती. परंतु पोर्तुगीज अामदानीत झालेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या गळचेपीत काही ठिकाणची परंपरा विस्मृतीच्या उदरात गडप झाली, तर काही ठिकाणी वर्षपरंपरेतला निदान धार्मिक विधी म्हणून सादर करणे गरजेचे मानतात. चर्मवाद्ये तन्मयतेने वाजवणारे वादक, त्यात पितळीच्या कासाळेचा उच्च स्वरातला ध्वनी आणि वडिलोपार्जित लोकगीत गायनाचा वारसा आदींच्या मनोहर आविष्कारात रसिक रममाण झालेले असतानाच मातीच्या मांडावर ती गराशेर, पारपती, माळी, सोलदार, पाखलो, पाखलीण, खाप्री आदी पात्रे प्रवेश करतात. आपल्या गायन, नृत्यातून आणि संवादातून या जमातीच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जीवनातले विविध पैलू पेश करतात.
...आणि त्यांच्यासोबत नाचणाऱ्या स्त्रिया म्हणजे श्रीकृष्ण सत्यभामा आणि रुक्मिणीची रुपे असल्याने मानले जाते. गावडा जमात शेकडो वर्षांपासून शेती, बागायती, पशुपालनाशी संबंधित असून त्यांच्या जीवनाशी आणि जगण्याशी नाते असणारे त्याचप्रमाणे गावगाडा हाकणारे कलाकार, कारागीरसारखी पात्रे असो, अथवा विविधांगी दृश्ये असो या साऱ्यांतून गावडा जमातीचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास समूर्त होत असतो. सोळाव्या शतकात गोव्यात विशेषत: तिसवाडीत धर्मांतराचा वरवंटा क्रूरपणे फिरवला गेला. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु असे असताना गावडा जमातीने आपली लोकदैवतांवरची अढळ श्रद्धा टिकवली आणि त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा त्याग करुन हिंदू धर्मात प्रवेश केल्यावर तुळशी वृंदावनाबरोबर येशू ख्रिस्ताचे प्रतीक असणाऱ्या क्राॅसचे पूजन फुलांनी सजवून करणे इथले कष्टकरी महत्त्वाचे मानतात. नमनाची जी लोकगीते गायिली जातात, त्यावेळी ते म्हणतात,
क्रुसा जेझु नमन नमन मारियेच्या सुता
नमन म्हझे गा समेस्ता
जेझु ख्रिस्ताच्या बारा ही भगता
सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात इथली सातेरी-केळबाय
आणि लोकंदैवतांची मंदिरे उद्धवस्त केली. धालो, शिगमो, जागोर यांच्यावर बंदी घातली. तेव्हा इथल्या जाणकार मंडळींनी येशू ख्रिस्त, मदर मेरी यांचा नमनात उल्लेख करून
आणि लोकनाट्यात पाखलो, पाखलीण, खाप्री, सोल्दार ही पात्रे घालून त्याला ख्रिस्ती धर्म आणि संस्कृतीतला एक प्रकार असल्याची भ्रांती निर्माण करून, जागोर सादरीकरणासाठी पोर्तुगीज सरकारची अनुमती मिळवली, असे कवी सुनील पालकर यांनी स्पष्ट केले. आज काळ बदलला, तरी पोर्तुगीज अमदानीतील क्राॅसचे पूजन, ख्रिस्ती देवदेवतांना नमन घालण्याची परंपरा कायम राखलेली आहे. जागोराची नावशी आणि काक्रा येथील परंपरा हिंदू-ख्रिस्ती संचितांतून निर्माण झालेल्या संकराचे आणि एकात्मतेचे दर्शन घडवते.