कर्नाटकात अवकाळी पाऊस; कलघटगीत गारपिटीमुळे भीषण परिस्थिती

कलघटगीत ‘हिमवर्षाव’सदृश दृश्य

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
कर्नाटकात अवकाळी पाऊस; कलघटगीत गारपिटीमुळे भीषण परिस्थिती

बेंगळुरू : कर्नाटकातील (Karnataka) अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची (heavy rainfall)  बरसात सुरू आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र काही ठिकाणी गारपीट (hailstorm) व जोरदार वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

कलघटगीत गारपिटीमुळे भीषण परिस्थिती

धारवाड जिल्ह्यातील कलघटगी तालुक्यात (Kalghatgi town) गारपिटीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. सायंकाळी अचानक पडलेल्या गारपिटीमुळे शेतजमिनी, रस्ते, मोकळी मैदाने आणि घरांची छप्परे जणू बर्फाने झाकल्यासारखी दिसू लागली. या अनपेक्षित घडामोडीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि लोकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.

गारांच्या थरामुळे अनेक किलोमीटरपर्यंत रस्ते झाकले गेल्याने वाहनचालकांना प्रवास करणे धोकादायक ठरले. गारपीट ओसरल्यानंतरच वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. धारवाड जिल्ह्यात इतर ठिकाणीही पावसासह गारांचा मारा झाला.  मात्र कलघटगीसारखी तीव्रता अन्यत्र दिसून आली नाही.

बेंगळुरूत (Bengaluru) मुसळधार पाऊस 

बेंगळुरूमध्ये संजययनगर, येलहंका आणि देवनहळ्ळी परिसरात मुसळधार पावसासोबत व‌िजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि गारपीट झाली. कोननकुंटे, कनकपुरा रोड, आरआर नगर, बनशंकरी भागात मध्यम ते जोरदार पाऊस नोंदवण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या बेंगळुरू केंद्राचे प्रमुख एन. पुवियारासन यांनी गारपीट अल्पकाळासाठी झाल्याची माहिती दिली.

या पावसाचा तापमानावर तत्काळ परिणाम झाला असून शहरातील कमाल तापमान १.३ अंशांनी घसरून ३२.३°सी वर आले. तर एचएएल विमानतळ परिसरात ते ३२°सी नोंदवले गेले. आपत्ती व्यवस्थापन पथकाने नागरिकांना मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक १५३३ किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९४८०६८५७०० वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा