
पणजी : पूर्वेकडून वाहणारे वारे व अन्य वातावरणातील बदलामुळे गोव्यात (Goa) आज आणि उद्या पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या दोन दिवसांसाठी पावसाचा ’यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे.
पाऊस प्रामुख्याने पश्चिम घाटाजवळील भागात पडण्याची शक्यता आहे. तर २० ते २४ मार्च दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारी पणजीत (Panjim) कमाल ३३.५ अंश तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मुरगाव मधील कमाल तापमान ३२.८ अंश व किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहीले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
याआधी खात्याने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या कालावधीत गोव्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरी पेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. वरील कालावधीत राज्यात सरासरी एवढा किंवा त्याहून किंचित कमी पाऊस पडण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली होती. गतवर्षी १ ते १० मार्च २०२५ दरम्यान उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. यंदा तुलनेने उकाडा कमी आहे.