
म्हापसा : म्हापसा (Mapusa) येथील मासळी (Fish) आणि चिकन-मटण मार्केट (Market) इमारतीच्या (Building) छतावरील पाण्याच्या टाक्यांना आग लागली व त्यातील चार पैकी तीन टाक्या जळाल्या. यात म्हापसा नगरपालिकेचे (Muncipality) अंदाजे २० हजारांचे नुकसान झाले आहे.
ही दुर्घटना बुधवारी पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास घडली. म्हापसा बाजारपेठेतील या मासळी व चिकन-मटण मार्केट प्रकल्प इमारतीच्या छतावर पालिकेने गोवा नागरी विकास एजन्सीतर्फे (सुडा) पत्र्यांचे आवरण घालण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी गॅस वेल्डींगचा वापर केला जात आहे.
इमारतीला पाणी पुरवठा करण्यासाठी छतावर १० हजार लीटर क्षमतेच्या चार पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या टाक्यांना पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. प्लास्टीकच्या या टाक्यांना आग लागताच ती भडकली. आगीच्या मोठ्या उडालेल्या ज्वाला पाहून बाजारपेठेत आलेल्या विक्रेत्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.
सकाळी ५.३०च्या सुमारास म्हापसा अग्निशमन दलाला माहिती मिळताच दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन मजली या इमारतीच्या छतावर चढून दलाचे उपअधिकारी प्रकाश कान्नाईक यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी आग नियंत्रणात आणली.
दरम्यान, ही आग लागण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. कारण वेल्डींगचे काम बंद होते. शिवाय इमारतीच्या छताचा दरवाजाही कुलूप बंद होता. या दुर्घटनेचा पुढील तपास म्हापसा पोलीस व पालिका अधिकारी करत आहेत.