पटलावर आलेल्या १३३२ प्रश्नापैकी विरोधकांचे ७८३ प्रश्न

पणजी : गोवा (Goa) विधानसभेचे (Assembly) अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) १५ दिवस चालण्याऐवजी ७ दिवसच चालले. पोटनिवडणुकीच्या (By-election) आचारसंहितेमुळे (Code of conduct) अधिवेशन मुदती पूर्वीच तहकूब केले. ७ दिवसांच्या कार्यकाळात विधानसभा पटलावर आलेल्या १३३२ प्रश्नांपैकी ७८३ प्रश्न विरोधी आमदारांचे होते. त्यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे सर्वात जास्त १२० प्रश्न होते. त्यात तारांकीत आणि अतारांकीत अशा दोन्ही प्रश्नांचा समावेश आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्चला सुरू झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहिल्याच दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. फोंडा पोटनिवडणुकीची घोषणा रविवारी १५ मार्चला झाली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर १६ मार्चला अधिवेशन तहकूब केले.
सात दिवसांच्या कामकाजात जे प्रश्न पटलावर आले त्यापैकी ६० टक्के प्रश्न हे विरोधी आमदारांचे होते. विरोधी आमदारांचे ७८३ तर सत्ताधारी आमदारांचे ५४९ प्रश्न पटलावर आले.
विरोधी आमदारांपैकी युरी आलेमाव यांच्या १२० प्रश्नांना उत्तरे मिळाली. कॉंग्रेसचे अॅड. कार्लुस फेरेरा यांचे ९७ तर एल्टन डिकोस्ता यांचे ११८ प्रश्न पटलावर आले.
आम आदमी पक्षाचे क्रुझ सिल्वा यांच्या ११० तर वेंझी व्हिएगस यांच्या १०८ प्रश्नाना उत्तरे मिळाली. आरजीचे विरेश बोरकर यांच्या ११८ तर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांच्या ११२ प्रश्नांना उत्तरे मिळाली. युरी आलेमाव यांच्यानंतर विरेश बोरकर यांचे ११८ प्रश्न पटलावर आले. सात दिवसांच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी प्रश्नोत्तराच्या वेळीच सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यामुळे खूप कमी तारांकीत प्रश्नांवर चर्चा झाली.
अधिवेशनात आलेले विरोधी आमदारांचे प्रश्न
आमदार प्रश्न
युरी आलेमाव १२०
कार्लुस फेरेरा ९७
एल्टन डिकोस्ता ११८
वेंझी व्हिएगस १०८
क्रुझ सिल्वा ११०
विजय सरदेसाई ११२
विरेश बोरकर ११८