
तेहरान : इराणचे (Iran) गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब (Esmail Khatib) यांचा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी केली आहे. या घटनेमुळे इराणमध्ये शोककळा पसरली असून; मध्यपूर्वेतील तणाव अधिकच तीव्र झाला आहे.
राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी या हल्ल्याला “भ्याड हत्या” असे संबोधत नागरिकांना शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे इराण दुःखात बुडाला असला तरी त्यांचा मार्ग अधिक ठामपणे पुढे सुरू राहील.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्झ ( Israel Katz) यांनी तेहरान येथे झालेल्या हवाई कारवाईत खतीब यांचा खात्मा केल्याचा दावा केला. त्यांनी स्पष्ट केली की, पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या मान्यतेने इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट कारवाई सुरू ठेवली जाईल.
याआधी इस्रायलने इराणचे वरिष्ठ नेते अली लारजानी ( Ali Larijani ) आणि पॅरामिलिटरी दलाचे प्रमुख गोलम्रेझा सुलेमानी (Gholamreza Soleimani) यांनाही हवाई हल्ल्यात ठार केल्याचा दावा केला होता.
विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी युद्धाच्या सुरूवातीलाच सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या हत्येनंतर इराणमधील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी कमांडर लक्ष्य करण्यात आले आहेत. या कारवायांमागे इस्रायल आणि अमेरिकेचा उद्देश इराणी नेतृत्व कमकुवत करणे असल्याचे मानले जात आहे.
तेलदरात मोठी वाढ
दरम्यान, इराणनेही प्रत्युत्तरादाखल मध्यपूर्वेतील विविध ठिकाणी हल्ले केले आहेत. या संघर्षामुळे होर्मुझ समुद्रधुनी (Strait of Hormuz ) या महत्त्वाच्या जलमार्गावर परिणाम झाला असून जागतिक तेलदरात मोठी वाढ झाली आहे.
इराणमध्ये १,३०० ठार
इराण सरकारच्या माहितीनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून १,३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून; त्यात महिला व मुलांचाही समावेश आहे. दुसरीकडे, मानवाधिकार संस्थांच्या मते मृतांचा आकडा याहून अधिक असू शकतो.
या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेत भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून; जागतिक पातळीवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत.