हिमाचल सरकारचा कडक निर्णय : कार्यालयात जीन्स-टी-शर्टला बंदी

कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड लागू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
36 mins ago
हिमाचल सरकारचा कडक निर्णय : कार्यालयात जीन्स-टी-शर्टला बंदी

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) : राज्य सरकारने सरकारी (Government) कर्मचाऱ्यांसाठी कडक ड्रेस कोड (Dress code) लागू करत कार्यालयीन शिस्तीवर भर दिला आहे. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, कार्यालयात जीन्स व टी-शर्ट घालण्यास स्पष्टपणे बंदी घालण्यात आली असून; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

कार्मिक विभागाने सर्व प्रशासकीय सचिव, विभागप्रमुख आणि विभागीय आयुक्तांना या नव्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी २०१७ मध्येही अशाच सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अनेक कर्मचारी त्याचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले होते.

नवीन नियमांनुसार, कार्यालयात किंवा न्यायालयीन कामकाजाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी साध्या व औपचारिक रंगातील पोशाख परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट-पॅन्ट किंवा कॉलर असलेले शर्ट घालणे अपेक्षित आहे, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी साडी, फॉर्मल सूट, सलवार-कमीज, चुरिदार किंवा दुपट्ट्यासह कुर्ता हा पोशाख अनिवार्य करण्यात आला आहे.

सरकारच्या या निर्णयामागे सार्वजनिक सेवेतील शिस्त, सभ्यता आणि प्रतिष्ठा राखण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरील वर्तनावरही नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा