गोव्यातील क्राईम ब्रांचची कारवाई

पणजी : गुन्हे शाखेने (Crime Branch) मोठी कारवाई करत एस्कॉर्ट वेबसाइटच्या (Escort website) माध्यमातून देशभरात वेश्याव्यवसायाचे (Prostitution) जाळे चालवणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अश्लील, लैंगिक स्वरूपाचे व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या वेबसाइट्सची निर्मिती करणारे, ऑपरेटर आणि व्यवस्थापकाविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांत व्ही. नारायणराव (४० वर्षे, शिवमोग्गा, कर्नाटक), शाहबाज खान (३३ वर्षे, भोपाळ, मध्यप्रदेश), मंजुनाथ शाहशेट्टी (३६ वर्षे, बिदर, कर्नाटक) या तिघांचा समावेश आहे.
क्राईम ब्रांच आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या संयुक्त पथकाने एस्कॉर्ट साइट्सवर लक्ष ठेवले होते. ९ मार्च रोजी आयटी अॅक्ट कलम ६७ तसेच महिलांच्या अशोभनीय चित्रण प्रतिबंधक कायद्यानुसार (Indecent Representation of Women Act) २२ वेबसाइट्सविरोधात गुन्हा दाखल करून त्या सर्व साइट्स ब्लॉक करण्यात आल्या होत्या.
तांत्रिक तपासादरम्यान कर्नाटकातील शिवमोग्गा येथील नारायण राव हा संशयित या वेबसाइट्स चालवत असल्याचे समोर आले. त्यानुसार क्राईम ब्रांचच्या विविध पथकांनी गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवून नेरुल, बार्देश येथे छापा टाकत मुख्य संशयितासह तिघांना अटक केली.
छाप्यात संशयितांकडून एस्कॉर्ट साइटसाठी वापरले जाणारे मोबाईल फोन, एक लॅपटॉप व चार मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच बँक खात्यांच्या तपासात पीडित महिलांकडून गुगल पे व यूपीआयद्वारे पैसे घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Immoral Trafficking Prevention Act) कलम ४ देखील लावण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्राथमिक चौकशीत नारायण राव हा देशभरात बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, जयपूर, दिल्ली आदी शहरांमध्ये हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे.
क्राईम ब्रांचकडून संशयितांच्या आर्थिक व्यवहारांचा अधिक तपास सुरू असून पीडित महिलांचा शोध घेतला जात आहे. मुख्य संशयिताच्या खात्यातील सुमारे २.३४ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक (क्राईम ब्रांच) राहुल गुप्ता व उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश वळवईकर, विकास देयकर हे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अमीन नाईक यांनी केली. स्वप्नील सिमेपुरुषकर, करिष्मा गुडगेरी, जसमीता चोपडेकर या पोलिसांचा या पथकात समावेश होता.