स्थानिकांची चिंता वाढली

पणजी : (Goa) दाबोळी (Dabolim) येथील प्रभू व्हायोलेटा इमारतीतील पिण्याच्या पाण्यात (Drinking water) सांडपाणी मिसळल्याने बाधीत झालेल्या रुग्णांची संख्या १८९ वर पोहोचली आहे. या रुग्णांना (Patient) अतिसार, उलट्या होत असून, अशक्तपणा आल्याने डॉक्टरकडे धाव घ्यावी लागली आहे. चिखली रुग्णालय व परिसरातील डॉक्टरांकडे रुग्णांची रांग लागली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी स्थानिकांना या मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. येथील दुषीत पाण्याची समस्या सोडवावी व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ही समस्या भेडसावत आहे. सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यानंतर दुषीत पाण्याचा फटका स्थानिकांना बसला. त्यात कित्येकांना अतिसार, उलट्या होऊ लागल्या व अशक्तपणा आल्याने नजीकच्या इस्पीतळात व डॉक्टरकडे धाव घ्यावी लागली. डॉक्टरांनी तपासणी करून दुषीत पाणी पोटात गेल्याने; अतिसार, उलट्या होत असल्याचे सांगितल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले.
चिखली कृती समितीचे सिरील फर्नांडिस यांनी सांगितले की, आज गुढीपाडव्याच्या शुभदिवशी दाबोळीतील स्थानिक त्रस्त आहेत. कित्येकांना रुग्णालयात व डॉक्टरकडे धाव घ्यावी लागली आहे. आतापर्यंत १८९ पेक्षा जास्त जणांना बाधा झाली आहे. येथील इमारतीची सांडपाणी निचरा व्यवस्था सदोष आहे. सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने व ते पोटात गेल्याने लोक आजारी पडले. आजारी पडत असलेल्यांचा आकडा वाढत आहे. प्रशासनाने यावर त्वरीत तोडगा काढून स्थानिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा. सांडपाणी नेमके कसे पिण्याच्या पाण्यात मिसळते ते शोधून काढून त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करावी; अशी मागणी सिरील फर्नांडिस यांनी केली.
येथील इतर स्थानिकांनीही समस्या सोडवून सुरळीत व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली. सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने; स्थानिकांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे. मात्र, त्यावर आवाज उठवल्यास दबाव आणून आवाज बंद केला जातो. खोट्या तक्रारीही नोंदवल्या जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दुरुस्तीचे काम सुरू
दरम्यान, पिण्याच्या पाण्यात सांडपाणी नेमके कोठून मिसळले, त्याचा शोध घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या पाण्याला दुर्गंधी येत होती. त्यामुळे स्थानिकांची भीती वाढली आहे. आता दुरुस्ती करून शुद्ध जलपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
एसटीपी प्रकल्प पूर्णत: कार्यरत : अमित प्रभू
दरम्यान, वास्कोतील 'प्रभू व्हायोलेटा'तील रहिवाशांकडून दूषित पाण्याबाबत अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. सर्व एसटीपी प्रकल्प पूर्णतः कार्यरत असून पाणी सुरक्षित असल्याचे प्रभू रिअल्टर्सचे अमित प्रभू यांनी सांगितले.