महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : भोदूबाबाचे काळे कारनामे उघड होण्याची शक्यता

नाशिक : नाशिकमध्ये स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेलिंग आणि कोट्यवधींच्या खंडणीचे आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्यात आला आहे.
राज्य गृह विभागाच्या आदेशानुसार, या एसआयटीच्या प्रमुखपदी महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध ठिकाणी दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा एकत्रित आणि निष्पक्ष तपास व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र पोलीस मुख्यालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय तपासाचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणमधील वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात एका पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये गंभीर कलमे लागू करण्यात आली असून, प्रकरणाचे स्वरूप अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.
राज्य शासनाने संबंधित सर्व पोलीस ठाण्यांना आदेश देत या प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि केस डायरी तात्काळ एसआयटीकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तपासाची प्रगती नियमितपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे तपासावर थेट देखरेख राहणार आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अशोक खरात याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. या डिजिटल पुराव्यांमुळे प्रकरण अधिक गंभीर झाले असून, त्याचा तपास एसआयटी मार्फत केला जाणार आहे.
प्राथमिक तपासात धार्मिक श्रद्धा आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचे आरोपही समोर आले आहेत. यासोबतच ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक फसवणुकीचेही धागेदोरे उलगडत असल्याने या प्रकरणाचा व्याप वाढत असल्याचे दिसून येते.
एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक आता जप्त केलेल्या व्हिडिओंचा तपास, संभाव्य पीडित महिलांचा शोध, आर्थिक व्यवहारांची चौकशी तसेच आरोपीच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संबंधांची तपासणी करणार आहे. या तपासातून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात आणखी किती पीडित पुढे येतात आणि तपासातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी एक व्हिडिओ व्हायरल
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर केला आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून गैरवर्तन केल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्याच्या या व्हिडीओने खळबळ माजवली आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण संतप्त प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
नाशिक पोलिसांचा मास्टर प्लान
नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अशोक खरातला अटक करण्यासाठी मास्टर प्लान आखला होता. आरोपी राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव केला. चोराला पकडण्यासाठी पोलीस परिसरात झडती घेत असल्याचे सांगत पथकाने विविध ठिकाणी तपास सुरू केला. याचाच भाग म्हणून काही पोलिसांनी खरातच्या घराचीही तपासणी सुरू केली. दरम्यान, घरात उपस्थित असलेल्या अशोक खरातला पाहताच पोलिसांनी क्षणार्धात कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या. या अनपेक्षित हालचालीमुळे आरोपीला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.