उत्पादन शुल्क खात्याची आकडेवारी : ७ महिन्यांत १ कोटी लिटर बिअरची विक्री

पणजी : गोव्यातील मद्यप्रेमी आणि विशेषतः पर्यटकांची पहिली पसंती ही 'इंडियन मेड फॉरन लिकर' (आयएमएफएल) पेक्षा बिअरलाच असल्याचे उत्पादन शुल्क खात्याने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
उत्पादन शुल्क खात्याच्या अहवालानुसार, जून ते डिसेंबर २०२५ या सात महिन्यांच्या कालावधीत गोव्यातील घाऊक विक्रेत्यांनी सुमारे १ कोटी बल्क लिटर बिअरची विक्री केली आहे. त्या तुलनेत आयएमएफएल (उदा. व्हिस्की, रम, ब्रँडी, जिन्न) मद्याची विक्री ८५ लाख बल्क लिटर इतकी झाली आहे. पर्यटन हंगामात बिअरला मिळणारी मागणी ही आयएमएफएलच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक असल्याचे यावरून स्पष्ट होते.
* विक्रीत सासष्टी अव्वल, तर बार्देश दुसऱ्या स्थानी
राज्यातील मद्यविक्रीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, सर्वाधिक विक्री सासष्टी तालुक्यात झाली आहे. सासष्टीमध्ये ३२ लाख बल्क लिटर बिअर आणि २६ लाख बल्क लिटर आयएमएफएलची विक्री झाली. त्यापाठोपाठ बार्देश तालुक्याचा क्रमांक लागत असून, तेथे ३३ लाख बल्क लिटर बिअर आणि २२ लाख बल्क लिटर आयएमएफएल खपले आहे. विशेषतः कळंगुट आणि बागा यांसारख्या पर्यटन क्षेत्रांमुळे बार्देशमध्ये बिअरला सर्वाधिक मागणी आहे.
अहवालानुसार, गोव्याच्या किनारपट्टी भागात बिअरची मागणी सर्वाधिक आहे. मात्र, राज्याच्या अंतर्गत भागातील चित्र वेगळे असून, तिथे बिअरपेक्षा आयएमएफएल (उदा. व्हिस्की, रम, ब्रँडी) घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
या यादीत फोंडा तालुका तिसऱ्या स्थानावर आहे. फोंड्यात २० लाख लिटर बिअर आणि १३.५ लाख लिटर आयएमएफएलची विक्री झाली आहे. फोंडा हे शहर राज्यातील मद्य पुरवठ्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते, जिथून दक्षिण आणि उत्तर गोव्यातील अनेक भागांत मद्याचा पुरवठा केला जातो.
