छातीत दुखण्याबाबत होती तक्रार

पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa Chief minister Pramod Sawant) यांच्यावर गुरुवारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या इस्पितळात ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. छातीत दुखण्याच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘ही प्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे,’ असे डॉ. पुरवेझ ग्रांट यांनी सांगितले.
गुरुवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे गुरुवार, १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सात वर्षे पूर्ण केली. दुपारी पुण्यातील इस्पितळात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर ॲन्जिओग्राफी करण्यात आली आणि त्यानंतर ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. समीन शर्मा यांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. सावंत यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे हृदयरोग सेवा विभागाचे चेअरमन आणि मुख्य कार्डिओलॉजिस्ट डॉ. पुरवेझ ग्रांट यांनी दिली. दरम्यान, ही नियमित आरोग्य तपासणी होती. माझी प्रकृती ठीक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवन वार्ताशी बोलताना सांगितले.