चार वर्षांत खर्च दुपटीहून अधिक; उत्पन्न मात्र मर्यादित

पणजीतील लोकोत्सवात खरेदीसाठी ग्राहकांनी केलेली गर्दी. (संग्रहित)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा कला व संस्कृती खात्यातर्फे पणजीच्या दर्यासंगमावर आयोजित केला जाणारा लोकोत्सव महत्त्वाचा वार्षिक कार्यक्रम आहे. या लोकोत्सवात रसिकांना विविध राज्यांतील कलांचा आस्वाद घेता येतो. तसेच विविध राज्यांतील उत्पादनेही खरेदी करता येतात. आठवडाभर चालणाऱ्या या लोकोत्सवात कोट्यवधींची उलाढाल होत असते. या कार्यक्रमासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्चही केला जातो. गेल्या चार वर्षांत या कार्यक्रमाच्या खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. २०२३ ते २०२६ या कालावधीत खर्च जवळपास दुपटीपेक्षा अधिक वाढला आहे, असे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
२०२३ मध्ये लोकोत्सवाच्या आयोजनासाठी सुमारे ३,१९,००,४७४ रुपये खर्च आला होता. २०२४ मध्ये तो १.०९ कोटी रुपयांनी वाढून ४,२८,७८,३६८ रुपये झाला. २०२५ मध्ये हा खर्च ४,७१,६९,१८६ रुपये इतका झाला, तर २०२६ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३.११ कोटी रुपयांनी वाढून तो सर्वाधिक ७,८३,००,००० रुपयांवर पोहोचला आहे. एकूणच चार वर्षांत लोकोत्सव आयोजनासाठीच्या खर्चात सुमारे ४.६४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
लोकोत्सवावेळी राज्यासह इतर राज्यांतील कलाकार, हस्तकला व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून स्टॉल्ससाठी दहा दिवसांचे भाडे आकारले जाते. हेच या कार्यक्रमाचे प्रमुख उत्पन्न आहे. २०२६ च्या लोकोत्सवातून सुमारे ६० ते ८० लाख रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, लोकोत्सव आयोजनाचे कंत्राट दरवर्षी ‘सीन अॅड इव्हेंट’ या एकाच कंपनीला देण्यात आले आहे. एकीकडे लोकोत्सव अधिक भव्य करण्याचा प्रयत्न होत असताना, वाढता खर्च आणि मर्यादित उत्पन्न यामुळे हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
वर्षनिहाय खर्च (रुपयांत)
वर्ष खर्च
२०२३ – ३,१९,००,४७४
२०२४ – ४,२८,७८,३६८
२०२५ – ४,७१,६९,१८६
२०२६ – ७,८३,००,०००