बुलेट मोटारसायकल पाडल्याच्या रागातून खूनप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा निश्चितीचे आदेश

मिरामार येथील २०२३ मधील घटना : प्रथमदर्शनी पुरावे समोर आल्याचे निरीक्षण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
53 mins ago
बुलेट मोटारसायकल पाडल्याच्या रागातून खूनप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा निश्चितीचे आदेश

पणजी : मिरामार येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन सुमीत मेगेरी (३१, कामराभाट - पणजी) याला मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान गोमेकाॅत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतरचा वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांची साक्ष तसेच ओळख परेडची दखल घेतल्यावर प्रथमदर्शनी पुरावे समोर आले आहेत, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सदोष मनुष्यवध प्रकरणी संशयित मायराॅन फर्नांडिस, गौरेश मंगेशकर आणि सालुसिन्हो आफोन्सो या तिघांचा विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.

याबाबतचा आदेश मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. बाॅस्को राॅबर्ट्स यांनी दिला.

मिरामार येथील टेम्टेशन रेस्टॉरंटजवळ १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ११.३० वा. सुमीत मेगेरी उभा असताना त्याच्या बाजूला उभी असलेली बुलेट मोटारसायकल खाली पडली होती. त्यावेळी संशयित मायराॅन फर्नांडिस, गौरेश मंगेशकर आणि सालुसिन्हो आफोन्सो या तिघांनी सुमीतशी वाद घालून त्याला दंडुक्याने आणि सायलन्सरने जबर मारहाण केली होती. त्यावेळी सुमीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला कुटुंबीयांनी खासगी इस्पितळात दाखल केले. त्यावेळी त्याच्यावर प्रथमोपचार करून घरी पाठविले होते. काही दिवसांनी त्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला खासगी इस्पितळात दाखल केले. तिथे त्याची तब्येत खालावल्यामुळे त्याला २४ एप्रिल २०२३ रोजी गोमेकॉत दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना ७ मे २०२३ रोजी सुमीतचा मृत्यू झाला.

न्यायालयात सुनावणी झाली असता, सरकारी वकील शिवराम पाटील यांनी संशयिताविरोधात साक्षीदारांनी दिलेली साक्ष, ओळख परेड आणि वैद्यकीय तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात सादर केला. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून सदोष मनुष्यवध प्रकरणी मायराॅन फर्नांडिस, गौरेश मंगेशकर आणि सालुसिन्हो आफोन्सो या तिघांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.

१५ नोव्हेंबर २०२४ मध्ये केले होते आरोपपत्र दाखल

सुमीत याच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पणजी पोलिसांनी मायराॅन फर्नांडिस आणि त्याच्या साथीदाराविरोधीत १७ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून १५ नोव्हेंबर २०२४ रोजी मेरशी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 

हेही वाचा