लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोप निश्चितीचा आदेश

उडुपी-कर्नाटकातील युवकावर आरोप

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25 mins ago
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोप निश्चितीचा आदेश

पणजी : महिलेने दिलेल्या तक्रारीत संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रथमदर्शनी पुरावे समोर आले आहेत, असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील जलदगती न्यायालयाने मूळ उडुपी-कर्नाटकातील संशयिताच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.

या प्रकरणी ३२ वर्षीय महिलेने पणजी महिला पोलीस स्थानकात २०२५ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तक्रारदार महिला आणि संशयितामध्ये २०१९ मध्ये मैत्री झाली. २०२१ मध्ये संशयिताने तिच्याशी लग्न करण्याची मागणी केली. या मागणीला तिने होकार दिला. त्यानंतर २०२३ ते २०२४ पर्यंत ते दोघे एकत्र राहू लागले. दरम्यान, संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. त्यात ती गरोदर राहिली होती. औषधोपचारामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर २० जानेवारी २०२४ रोजी संशयिताने तो आपल्या मूळ गावी जाईल आणि आपल्या आई-वडिलांना त्यांच्या लग्नाबाबत माहिती देईल असे सांगून गेला. या घटनेनंतर २६ जानेवारी २०२४ पासून त्याचा फोन बंद येत होता. तक्रारदार महिलेने त्याच्या आई-वडिलांकडे चौकशी केली असता, त्याची माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयिताचा शोध लावला असता, त्याने तिच्याशी लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले. याच दरम्यान ११ आणि १६ एप्रिल २०२५ रोजी संशयिताने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले.

संशयिताला लग्नाचे मागणी आल्याची माहिती मिळाली आणि त्याला संशयिताने होकार दिल्याचे समजले. त्यानंतर तक्रारदार महिलेने २०२५ मध्ये पणजी महिला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली.

१७ मे २०२५ रोजी न्यायालयाने संशयिताला सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून १७ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून उडपी - कर्नाटकातील संशयिताच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.

दुसरीकडे लग्न ठरल्यावर प्रकार उघडकीस

संशयिताला दुसऱ्या ठिकाणाहून लग्नाची मागणी आल्याची माहिती मिळाली आणि त्याने त्या प्रस्तावाला होकार दिल्याचे समजले. यानंतर तक्रारदार महिलेने २०२५ मध्ये पणजी महिला पोलीस स्थानकात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा नोंदवला.