‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाने महिलेला सव्वा दोन लाखांचा गंडा

मडगावात महिलेची फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता​ |
21 mins ago
‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाने महिलेला सव्वा दोन लाखांचा गंडा

मडगाव : जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची घटना मडगाव येथे घडली. मडगाव येथील एका ४९ वर्षीय महिलेची २ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला.

मूळ विजयवाडा, आंध्रप्रदेश येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या मडगावात वास्तव्यास असलेल्या गोत्रु क्रांती राजकुमार यांनी याप्रकरणी मडगाव पोलिसात तक्रार नोंदवली आहे. दि. ९ मार्च ते १३ मार्च या पाच दिवसांच्या कालावधीत ही फसवणूक झाली. त्यांनी वेगवेगळ्यावेळी पैसे गुंतवले होते.

​आर्थिक फसवणूक करणाऱ्याने प्रथम व्हॉट्सॲप आणि नंतर टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून महिलेशी संपर्क साधला. संशयिताने ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे मोठी कमाई करता येईल आणि गुंतवलेल्या रकमेवर जादा परतावा मिळेल, असे आमिष पीडित महिलेला दाखवले. संशयिताच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने एकूण २ लाख २० हजार रुपये संशयिताने सांगितलेल्या योजनेत गुंतवले. मात्र, पैसे भरल्यानंतर कोणताही परतावा मिळाला नाही. तसेच समोरच्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळणे बंद झाल्याने आपल्याला फसवले गेल्याचे महिलेच्या लक्षात आले.

​महिलेने तक्रार केल्यानंतर ​मडगाव पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोराविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वदेश देसाई या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.