कपिल चौधरी हत्या खटल्याला सत्र न्यायालयात सुरुवात

रेन्ट अ कॅब गाडी चोरी प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 mins ago
कपिल चौधरी हत्या खटल्याला सत्र न्यायालयात सुरुवात

म्हापसा : पिर्ण बार्देश येथील पठारावर कपिल चौधरी (१९, रा. हातरस, उत्तर प्रदेश) या युवकाच्या खून प्रकरणाचा खटला जिल्हा सत्र न्यायालयात सुरू झाला आहे. कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणी एका फरार आरोपीसमवेत ९ संशयितांविरुद्ध डिचोली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयामार्फत आता सुरू आहे.

संशयित आरोपीमध्ये कार मालक गुरुदत्त सुभाष लवंदे (३१, रा. आनावाडो कांदोळी), डायसन आग्नेलो कुतिन्हो (३१, रा. उमतावाडो कळंगुट) सूरज जोतीश ठाकूर (२१, रा. कांदोळी), विठ्ठल विद्याधर तुयेकर (३४, रा. आनावाडो, कांदोळी), रविश्वर रमेश नाईक (३५, रा. आराडी गिरी), आकीनो राजन परेरा (२८, रा. पैनावाडो थिवी), विनायक मारुती कांबळे (२८, रा. गौरावाडा, कळंगुट), ओंकार उदय गावडे (२३, रा. गावडेवाडा मांद्रे) व शॉन शिल्टन सिल्वेरा उर्फ सांतू (रा. गौरावाडा कळंगुट) यांचा समावेश आहे.

या संशयितांमधील शॉन सिल्वेरा उर्फ सांतू हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. कोलवाळ पोलिसांनी संशयितांविरुद्ध ६९ साक्षीदारांच्या साक्षीसह ४५० पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

खुनाचा प्रकार ३० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री घडला होता. तर, मृतदेह ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सापडला होता. भाड्याने घेतलेली जीए ०३ एएच ५२५४ क्रमांकाची थार जीप चोरून नेण्याच्या संशयावरून संशयितांनी कपिल याला बांदा-सावंतवाडी येथे पकडून जबर मारहाण केली. दंडुके व लाथाबुक्यांनी मारहाण केल्यानंतर त्याला थिवी व पीर्ण टेकडीवर घटनास्थळी निर्जन अशा ठिकाणी टाकण्यात आले. त्याचा मृत्यू दारुमया नशेत झाल्याचे भासवण्यासाठी त्याच्या खिशात दारूची बाटली संशयितांनी घातली होती.

म्हापसा जिल्हा इस्पितळात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. त्याच्या शरीरावर लाकडी दांडा, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाणीचे व्रण होते. त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते.

याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी १ नोव्हेंबर रोजी सकाळी रेन्ट अ कॅब व्यावसायिक गुरुदास लवंदे याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी इतर सात जणांना अटक करीत या खून प्रकरणाचा उलगडा केला.

कपिल याने गुरुदत्त लवंदे याच्याकडून ३० ऑक्टोबर रोजी थार जीप भाड्याने घेतली होती.

कार चोरीच्या संशयावरून मारहाण

आपली गाडी चोरून नेली जात असल्याचे लक्षात येताच गुरुदत्त लवंदे याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन थार जीपचा पाठलाग केला. कुडाळ -कणकवली येथे त्यांनी ही जीपगाडी अडवली. युवकाकडून समानधारक उत्तर मिळत नसल्याने संशयितांनी त्याला तिथेच मारझोड केली होती. 

हेही वाचा