बजरंग दलाच्या माहितीवरून पोलिसांची कारवाई; १.१० लाखांचे मांस, कार जप्त, एक जण ताब्यात

वाळपई : गोवा-कर्नाटक सीमेवरील केरी चेकपोस्टवर बुधवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोमांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कारची तपासणी केली असता त्यामधून सुमारे ३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मांसाची अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बेळगावहून गोव्याच्या दिशेने बेकायदेशीर गोमांस वाहतूक केली जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी केरी सीमावर्ती चेकपोस्टवर तपासणी अधिक कडक केली.
तपासणीदरम्यान जी. ए. -०५ बी २६३० क्रमांकाची कार दिसून आली. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाकडे चौकशी केली केली असता वाहनाच्या डिकीत व आतील भागात पिशव्यांमध्ये ठेवलेले सुमारे ३०० किलो गोमांस आढळून आले. चालकाकडे या मांसासंबंधी कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने ही वाहतूक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ मांसासह कार जप्त केली.
या प्रकरणी अहमद (वय ४७, रा. रामापूर, ता. खानापूर, जि. बेळगाव) याला वाळपई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भा. न्या. सं. कलम ३२५ तसेच गोवा प्राणी संरक्षण कायदा १९९५ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंद केला.
ही कारवाई १८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता केरी चेकपोस्ट येथे करण्यात आली. पुढील तपास वाळपई पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रथमेश गावस करत आहेत. पोलिसांनी जप्त केलेले मांस तपासणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
गोमांस वाहतुकीसाठी आलिशान कारचा वापर
गेल्या काही महिन्यांपासून अनमोड घाट व चोर्ला घाट मार्गाद्वारे बेकायदेशीर गोमांस वाहतुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. यासाठी इनोव्हा, इंडिगो तसेच इतर आलिशान कारचा वापर करण्यात येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
सीमावर्ती भागात वाढती चिंता
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. केरी चेकपोस्टवर बेकायदेशीर गोमांस वाहतुकीचे प्रकार वारंवार उघडकीस येत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी सीमावर्ती भागात बेकायदेशीर वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.