बहुतेक प्रकरणांत चौकशी पूर्ण; संबंधित शिक्षकांवर कारवाई

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात ऑगस्ट २०२३ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या १२ घटनांची नोंद झाली आहे. यातील ८ प्रकरणे हायस्कूल, ४ प्राथमिक शाळा, तर १ उच्च शिक्षण संस्थेमधील होती. यातील ८ घटना अनुदानित शिक्षण संस्थांतील, तर ४ सरकारी शाळांमधील आहेत. बहुतेक प्रकरणांत शिक्षण खात्यातर्फे चौकशी पूर्ण झाली असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये नामोशी गिरी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची तक्रार आली होती. याप्रकरणी तक्रारदार चौकशीसाठी न आल्याने शिक्षिकेला निर्दोष ठरवण्यात आले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये विठ्ठलापूर येथील प्राथमिक शाळेत झालेल्या मारहाणीच्या तक्रारीबाबत शिक्षकाला निर्दोष ठरवण्यात आले. ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीस्थळ काणकोण येथील सरकारी शाळेत झालेल्या मारहाणीच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आले.
सप्टेंबर २०२४ मध्ये कामुर्ली येथील अनुदानित प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला मारहाणप्रकरणी कंत्राटी शिक्षकाच्या निलंबनाचा आदेश जारी केला गेला. डिसेंबर २०२४ मध्ये बोर्डा मडगाव येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत झालेल्या मारहाणप्रकरणी शिक्षिकेची खात्यात अन्यत्र बदली करण्यात आली. डिसेंबर २०२४ मध्ये खोर्जुवे येथील अनुदानित शाळेत झालेल्या मारहाणप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.
दोन प्रकरणांत शिक्षकांचे निलंबन
२०२५ मध्ये म्हापसा, कुडचडे, सेंट इस्तेवाम सांगे, काणकोण येथील अनुदानित माध्यमिक शाळांत विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. दोन प्रकरणी शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. अन्य दोन प्रकरणांत चौकशी सुरू आहे. जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या एका प्रकरणात शाळा व्यवस्थापनाने शिक्षकाची पगारवाढ थांबवली आहे. तसेच त्याला दंड करण्यात आला आहे.