पोलिसांकडून गुन्हा दाखल : घरगुती वापराचे दोन गॅस सिलिंडर जप्त

म्हापसा : पर्वरी येथील आमंत्रण उडपी पुअर व्हेज रेस्टॉरन्टच्या मालक व व्यवस्थापकाविरुद्ध घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक वापरासाठी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नागरी पुरवठा खात्याच्या बार्देश विभागाच्या कारवाईच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला.
शुक्रवार, दि. २० रोजी सायंकाळी ४.१० वा. सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नागरी पुरवठा खात्याच्या बार्देश विभाग अधिकाऱ्यांना पर्वरी भागात राबवलेल्या नियमित देखरेख व तपासणी मोहिमेवेळी ‘आमंत्रण उडपी पुअर व्हेज रेस्टॉरन्ट’ या रेस्टॉरन्टमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर स्वयंपाकासाठी केला जात असल्याचे आढळून आले.
रेस्टॉरन्टच्या किचनमध्ये दोन घरगुती गॅस सिलिंडर होते. याचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात होता. हे गॅस सिलिंडर नागरी पुरवठा खात्याच्या पथकाने जप्त केले. ही कारवाई खात्याचे संचालक जयंत तारी व सहाय्यक संचालिका दीपा फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्देश विभाग निरीक्षक राजीव सावंत, उपनिरीक्षक सर्वेश नाईक तुयेकर, सदाशिव खांडेपारकर, वासुदेव शिरोडकर व रोहीत तळणकर या पथकाने केली.
दरम्यान, राज्यात एकीकडे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे काही व्यावसायिक आस्थापनांकडून सर्रासरित्या घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा बेकायदा वापर सुरूच असल्याचे या कारवाईमुळे अधोरेखीत होत आहे.
नागरी पुरवठा खात्यातर्फे बार्देश निरीक्षक राजीव सावंत यांनी सदर रेस्टॉरन्ट मालकाविरुद्ध पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रेस्टॉरन्टचे मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध एलपीजी पुरवठा आणि वितरण आदेश २००० कायदा कलम ३(१)(क) व अत्यावश्यक वस्तू कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे हे करीत आहेत.