५७.६ टक्के महिला, ४२.४ टक्के पुरुष : तीन वर्षांत आढळले कॅन्सरचे ८७८२ रुग्ण

पणजी : राज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कॅन्सरचे (Cancer) प्रमाण अधिक आहे. मागील तीन वर्षांत राज्यात ऑगस्ट २०१८ ते डिसेंबर २०२५ कॅन्सरचे ८७८२ रुग्ण आढळले होते. यातील ५०५६ रुग्ण (५७.६ टक्के) महिला होत्या. तर ३७२६ रुग्ण (४२.४ टक्के) पुरुष होते. वरील कालावधीत पुरुष रुग्णांचे प्रमाण ६०.५ टक्क्यांनी, तर महिला ५७.९२ टक्क्यांनी वाढले आहे. वर्षनिहाय पाहता ५१ ते ७० वर्षे वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सहा वर्षांत या वयोगटातील रुग्णसंख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २०२० मध्ये ९४९ रुग्णांपैकी ४०० पुरुष ( ४२.२ टक्के), तर ५४९ महिला ( ५६.८ टक्के) होत्या. २०२१ मध्ये उपचार घेतलेल्या ९७० रुग्णांपैकी ४१९ पुरुष ( ४३.२ टक्के), तर ५५१ ( ५६.८ टक्के) महिला होत्या. २०२२ मध्ये उपचार घेतलेल्या ११५४ रुग्णांपैकी ४९२ पुरुष (४२.६ टक्के), तर ७७३ ( ५७.९ टक्के) महिला होत्या. २०२३ मध्ये उपचार घेतलेल्या १३३४ रुग्णांपैकी ५६१ पुरुष ( ४२.१ टक्के), तर ८४२ (५९.७ टक्के) महिला होत्या. २०२४ मध्ये १४०९ रुग्णांपैकी ५६७ पुरुष ( ४०.२ टक्के), तर ८४२ (५७.५ टक्के) महिला होत्या.
वर्ष २०२५ मध्ये आढळलेल्या १५०९ रुग्णांपैकी ६४२ पुरुष (४५.२ टक्के), तर ८६७ (५७.५ टक्के) महिला होत्या. वरील कालावधीत वयोगटानुसार पाहता, एकूण रुग्णांपैकी २३४ (२.७ टक्के) हे १५ वर्षांखालील होते. ४७८ (५.४ टक्के) हे १६ ते ३० वर्षे वयाचे होते. ३१ ते ५० वर्षांचे २७८८ (३१.८ टक्के) रुग्ण होते. ५० ते ७० वर्षांचे ३९६२ (४५.२ टक्के) रुग्ण होते, तर ७० वर्षांवरील १३१० (१४.९ टक्के) रुग्ण होते.
स्तनांच्या कॅन्सरसाठी उपचार घेणारे रुग्ण जास्त
वरील कालावधीत विविध प्रकारच्या कॅन्सरची आकडेवारी पाहता, स्तनांच्या कॅन्सरसाठी (Chest Cancer) उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. एकूण रुग्णांपैकी २२०० (२५.४ टक्के) स्तनांच्या कॅन्सरसाठी उपचार घेत होते. यानंतर गस्ट्रोइन्टेस्टाइल (पचनसंस्थेसंबंधित) १६१३ (१७.८ टक्के), हेड अँड नेक साठी १२९४ (१४.६ टक्के) रुग्णांनी उपचार घेतले.